Join us

करचोरी रोखण्यासाठी आणला GST; तरीही 12,700 कोटींचा चुना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 7:35 PM

चालू आर्थिक वर्षात फक्त आठ महिन्यात 12,766 कोटी रुपयांची करचोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. याबाबतची माहिती वित्त मंत्रालयाकडून ट्विटवरुन देण्यात आली आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून 1 जुलै 2017 पासून संपूर्ण देशात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करण्यात आला. जीएसटी लागू केल्यानंतर करचुकवेगिरी बंद होईल असा दावा केंद्र सरकारकडून करण्यात आला होता. मात्र, 18 महिन्यांनंतर सुद्धा करचुकवेगिरीला लगाम बसला नाही. चालू आर्थिक वर्षात फक्त आठ महिन्यात 12,766 कोटी रुपयांची करचोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. याबाबतची माहिती वित्त मंत्रालयाकडून ट्विटवरुन देण्यात आली आहे.

वित्त मंत्रालयाच्या माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षात पहिल्या आठ महिन्यात (एप्रिल ते नोव्हेंबर) जीएसटी चोरी झाल्याची एकूण 3,196 प्रकरणे उघडकीस आली. यामध्ये 12,766 कोटी रुपयांची चोरी करण्यात आली होती. मात्र, या कालावधीत 7,900 कोटी रुपयांहून अधिक जीएसटी वसूल करण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी जीएसटी चोरी रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक पाऊले उचलली जात आहेत, असे मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे. 

चालू आर्थिक वर्षात एप्रिल महिन्यात 1.03 लाख कोटी रुपये इतका जीएसटी जमा झाला. त्यानंतर मे महिन्यात 94,016 कोटी रुपये, जून महिन्यात 95,610 कोटी रुपये, जुलै महिन्यात  96,483 कोटी रुपये, ऑगस्ट महिन्यात 93,960 कोटी रुपये, सप्टेंबर महिन्यात  94,442 कोटी रुपये आणि ऑक्टोबर महिन्यात  1,00,710 कोटी रुपये जीएसटी केंद्र सरकारकडे जमा झाला. तर, नोव्हेंबर महिन्यात 97,637 कोटी रुपयांचा जीएसटी वसूल करण्यात आला आहे.    

टॅग्स :जीएसटी