Lokmat Money > बिझनेस न्यूज > जीएसटी ‘करा’ग्रे वसते लक्ष्मी!

जीएसटी ‘करा’ग्रे वसते लक्ष्मी!

कृष्णा, भारत देशात सर्वत्र लक्ष्मीची पूजाअर्चा दिवाळीनिमित्त प्रसन्न मनाने केली जाते.

By admin | Published: October 31, 2016 06:39 AM2016-10-31T06:39:54+5:302016-10-31T06:39:54+5:30

कृष्णा, भारत देशात सर्वत्र लक्ष्मीची पूजाअर्चा दिवाळीनिमित्त प्रसन्न मनाने केली जाते.

GST 'Kar'Grey lies Lakshmi! | जीएसटी ‘करा’ग्रे वसते लक्ष्मी!

जीएसटी ‘करा’ग्रे वसते लक्ष्मी!


-सी. ए. उमेश शर्मा
अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, भारत देशात सर्वत्र लक्ष्मीची पूजाअर्चा दिवाळीनिमित्त प्रसन्न मनाने केली जाते. त्यामुळे घरात सदैव लक्ष्मीचा अर्थात, पैशाचा वास राहो व सुबत्ता राहो, अशी अर्चना केली जाते. १ एप्रिल २०१७ पासून जीएसटीचा कायदा लागू होण्याची अपेक्षा आहे. अर्थमंत्री लक्ष्मीला जीएसटी प्रसन्न होवो, अशीच अर्चना करीत असेल. ज्या भारतात सुबत्ता व समृद्धी राहो. या जीएसटीविषयी आज चर्चा करू या.
कृष्णा (काल्पनिक पात्र) : अर्जुना, जेथे लक्ष्मीचा वास तेथे सदैव समृद्धीचा सहवास असे, म्हटले जाते. सरकारला कररूपी लक्ष्मी जीएसटीद्वारे मिळो व आर्थिक प्रगती होवो, हीच अपेक्षा या दिवाळीनिमित्त अर्थमंत्रालय करत असेल. जीएसटी हा कर कायद्यामधील सर्वात मोठा बदल आहे. याचा परिणाम प्रत्येक वस्तू व सेवा यांच्या दरावर होणार आहे. या कायद्यातील माल, वस्तू व सेवावर जीएसटीचा दर व इतर माहिती नंतर दिली जाईल, असे जीएसटी कौन्सिल म्हणत आहे. तरी हा कायदा काय आहे, हे जाणून घेणे प्रत्येक व्यापाऱ्याची गरज आहे.
अर्जुन : कृष्णा, जीएसटी म्हणजे काय?
कृष्णा : अर्जुना, जीएसटी हा वस्तू व सेवांवर कर लावणारा एकत्रित कायदा आहे. यामध्ये व्यापाराच्या प्रत्येक स्तरावर मूल्यवर्धनावरच कर लागणार आहे. यामध्ये प्रत्येक स्तरावर खरेदीदाराला वस्तू व सेवेच्या खरेदीवर भरलेला जीएसटीचा सेट आॅफ मिळणार आहे. शेवटी वापर करणाऱ्याला या साखळीमधील ज्याच्याकडून खरेदी केले, त्याला जीएसटी द्यावा लागेल. २० लाखांच्या वर वार्षिक उलाढाल असल्यास स्टेट व सेंट्रल जीएसटी लागेल, तसेच आयजीएसटीसाठी मर्यादा नाही.
अर्जुन : कृष्णा, जीएसटीची ठळक वैशिष्ट्ये काय आहेत?
कृष्णा : अर्जुना, जीएसटीची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहे -
१) जीएसटी दोन भागांमध्ये विभागलेला आहे. १) केंद्र शासनाने आकारलेला सेंट्रल जीएसटी व २) राज्य शासनाने आकारलेला स्टेट जीएसटी, परंतु जीएसटी कायद्याच्या तरतुदी जसे कर आकारणी, कर लागण्याची वेळेची करपात्र व्यक्तीची व्याख्या, वस्तूंचे वर्गीकरण इ. सर्वदूर एकसमान राहील.
२) सूट दिलेल्या वस्तू, सेवा व उलाढाल ठरावीक मर्यादेपेक्षा कमी असेल, तर ते सोडून सेंट्रल व स्टेट जीएसटी हे प्रत्येक वस्तू व सेवेच्या व्यवहारावर लागू होणार आहे.
३) सेंट्रल जीएसटी भरताना सेंट्रल जीएसटीच्याच इनपुट टॅक्स क्रेडिटचा सेट आॅफ घेता येईल, तसेच स्टेट जीएसटी भरताना स्टेट जीएसटीचाच सेट आॅफ घेता येईल.
४) साधारणत: सेंट्रल व स्टेट जीएसटीचा सेट आॅफ एक दुसऱ्यामध्ये अ‍ॅडजेस्ट करता येणार नाही.
५) सेंट्रल व स्टेट जीएसटी गोळा करण्याची पद्धत शक्य तेवढी एकसमान ठेवण्यात येईल.
६) सेंट्रल जीएसटी केंद्र शासन चालवेल व स्टेल जीएसटी राज्य शासन चालवेल.
७) करदात्याला सेंट्रल जीएसटी व स्टेट जीएसटीचे नियमित ठरावीक कालावधीनंतर रिटर्न दाखल करावे लागतील.
८) प्रत्येक करदात्याला पॅनशी निगडित टॅक्सपेयर आयडेंटीफिकेशन नंबर १३ ते १४ नंबरचा राहील. यामुळे आयकर विभाग व जीएसटी यांची माहिती देवाण घेवाण वाढते.
अर्जुन : कृष्णा, सेंट्रल जीएसटी व स्टेट जीएसटी दोन्ही एकाच वेळेत कसे लागू होतील?
कृ ष्ण : अर्जुना, सेंट्रल आणि स्टेट जीएसटी वस्तू व सेवा यांच्या पुरवठ्याच्या साखळीमध्ये काही वस्तू व सेवा व विशिष्ट मर्यादा सोडून प्रत्येक व्यवहारावर लागणार आहे. दोन्हीही एकाच वस्तू व सेवांच्या किमतीवर आकारले जाईल, तसेच सेंट्रल जीएसटीसाठी सप्लायरचे स्थान व प्राप्त करणाऱ्यांचे देशातील कोणतेही स्थान असेल, तरी फरक पडणार नाही, परंतु स्टेट जीएसटी माल देणारा व घेणारा दोघेही एकाच राज्यात असतील, तरच लागू होईल.
उदा. जर सेंट्रल जीएसटीचा दर १० टक्के व स्टेट जीएसटीचा दर १० टक्के असेल, तर एका होलसेलरने त्याच राज्यात असलेल्या कंपनीला रु. १०० चा माल विकला, तर डिलरला
१० रु. सीजीएसटी व १० रु. एस जीएसटी आकारावा लागेल, तसेच सी जीएसटी भरताना खरेदी केलेल्या वस्तूंवर व सेवावर लागलेला सी जीएसटी भरताना, खरेदी केलेल्या वस्तूंवर व सेवावर लागलेला सी जीएसटी वजा करावा लागेल, तसेच एस जीएसटीचा सेट आॅफ वजा करावा लागेल, तसेच एस जीएसटीचा सेट आॅफ वजा करून एस जीएसटी भरावा लागेल.
अर्जुन : कृष्णा, आंतरराज्यीय वस्तू व सेवा यांच्या व्यवहारावर जीएसटी कसा व कधी आकारला जाईल?
कृष्णा : अर्जुना, आंतरराज्यीय वस्तू व सेवा यांच्या व्यवहारावर इंट्रीग्रेटेड जीएसटी (आयजीएसटी) आकारला जाईल. जीएसटीमध्ये वस्तू व सेवा दोघांवर केंद्र व राज्य शासन दोन्हीही कर लावणार आहेत. आंतरराज्यीय विक्री करणारा मूल्यवर्धनावर आय जीएसटी, सेंट्रल व स्टेट जीएसटीचे क्रेडिट घेऊन आयजीएसटी भरेल.
>अर्जुन : कृष्णा, करदात्याने यातून काय बोध घ्यावा?
कृ ष्णा : अर्जुना, दिवाळीत अंधार दूर होऊन सर्व जणांचे जीवन प्रकाशमान होवो! अशीच सरकारची इच्छा असते. मनुष्याने कष्ट करून, विद्याअर्चन करून सुकर्माद्वारे लक्ष्मी अर्जित करावी. शासनाला कराद्वारे उत्पन्न होते. शासन जीएसटी अमलात आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहे. १ एप्रिल २०१७ पासून जीएसटी लागू होइल, अशी अपेक्षा आहे. हिशोबाची पुस्तके दिवाळीनिमित्त पूजली जातात, ज्याने पुढील वर्षी चांगला नफा होवो! जीएसटीद्वारे सर्वांना पुढील वर्षी फायदा होवो, हीच आशा आहे. ‘करा’ग्रे वसते लक्ष्मी, म्हणजेच टॅक्समध्ये लक्ष्मीचे रूप आहे. याचे उचित उपयोग शासनाद्वारे होऊन देशाची उन्नती होवो!

Web Title: GST 'Kar'Grey lies Lakshmi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.