नवी दिल्ली : आगामी काळात मोबाईल महाग होणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. शनिवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची 39 वी बैठक पार पडली. या बैठकीत मोबाईलवरील जीएसटी दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मोबाईलवरील जीएसची दर 12 वरून 18 टक्के करण्यात येणार आहे. त्यामुळे आता जीएसटी दरात 6 टक्क्यांची वाढ होणार आहे. यामुळे साहजिकच मोबाईलच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर याबाबतची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.
याचबरोबर, विमानाच्या देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉल (एमआरओ) सेवेच्या जीएसटी दरात घट करण्यात आली आहे. याआधी हा दर 18 टक्क्यांच्या स्लॅबमध्ये होता, त्यामध्ये आता घट होऊन 5 टक्क्यांवर आणला आहे. जीएसटी परिषदेने हा निर्णय भारतात एमआरओच्या सेवेला चालना देण्याच्या उद्देशाने घेतला आहे.
याशिवाय, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यापाऱ्यांना दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2018-19 साठी जीएसटी रिटर्न फाइल करण्याची तारीख 30 जून 2020 केली आहे. तसेच, ज्यांचे टर्नओव्हर 2 कोटींपेक्षा कमी आहे, त्यांना लेट रिटर्न फाइल करण्यावर दंड बसणार नाही.
तसेच, यावेळी जीएसटी नेटवर्कला अधिक चांगले बनवण्यात येणार आहे. यासाठी आयटी कंपनी इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन नीलेकणी यांनी प्रेझेंटेशन दिले आहे.