- - उमेश शर्मा
(चार्टर्ड अकाउण्टण्ट)
अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, आर्थिक वर्ष २०२०-२१च्या जीएसटी वार्षिक रिटर्नचा तपशील फॉर्म जीएसटीआर-९ आणि फॉर्म जीएसटीआर-९सी मध्ये नवीन काय बदल करण्यात आला आहे?
कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, अधिसूचना क्रमांक ३०/२०२१ तारीख ३० जुलै २०२१ च्या सीजीएसटी नियम २०१७ नुसार या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. हे नियम ०१ ऑगस्ट २०२१ पासून लागू होतील. काही महत्त्वाचे बदल यात घडवून आणले आहेत.
अर्जुन : जीएसटीआर-९ (जीएसटी वार्षिक रिटर्न) आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये कोणाला दाखल करावा लागेल?
कृष्ण : प्रत्येक नोंदणीकृत व्यक्ती ज्याची आर्थिक वर्षाची उलाढाल ही २ कोटींपेक्षा जास्त आहे त्यांनी जीएसटीआर-९ हा पुढील आर्थिक वर्षातील ३१ डिसेंबर या तारखेपर्यंत भरणे आवश्यक आहे (म्हणजेच आर्थिक वर्ष २०२०-२१ चा वार्षिक तपशील ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत भरावा.) कम्पोजिशन करदाता आणि ई-कॉमर्स ऑपरेटर यांनी जीएसटीआर-९ए आणि ९बी दाखल करावे. आर्थिक वर्ष २०२०-२१ पासून ज्या करदात्यांची वार्षिक उलाढाल २ कोटींपेक्षा कमी असेल, त्यांना वार्षिक रिटर्न भरणे गरजेचे नाही. या आधी रिटर्न दाखल करण्यास पर्याय होता. हा एक प्रमुख बदल केला आहे.
अर्जुन : जीएसटीआर-९सी मध्ये काय बदल झाले आहेत?
कृष्ण : ज्यांची मागील आर्थिक वर्षातील उलाढाल ५ कोटींपेक्षा जास्त होती, असे करदाते जीएसटीआर-9सी दाखल करतील. पूर्वी जीएसटी ऑडिट हे चार्टर्ड अकाउंटंटकडुन प्रमाणित करावे लागत होते; परंतु आता त्यांची गरज भासणार नाही, कारण आता करदात्याने स्वत:च कर देयाचे रिकन्सीलिएशन करायचे आहे आणि ते स्वत:च प्रमाणित करून पुढील आर्थिक वर्षाच्या ३१ डिसेंबरपर्यंत दाखल करायचे आहे.
अर्जुन : करदात्याने जीएसटीआर-९ आणि 9सी दाखल करताना काय लक्षात घ्यावे?
कृष्ण : करदात्याने आता स्वत:च प्रमाणित केलेले जीएसटीआर-9सी हे कर देयकाच्या रिकन्सीलिएशन सोबत घ्यावे आणि तसेच जीएसटीआर-९सी केव्हा लागू होईल याची नोंद घ्यावी. आता करदात्यांना स्वत:हून ही काळजी घ्यावी लागणार आहे.
GST: जीएसटीच्या वार्षिक रिटर्नचे नवे नियम
GST: आर्थिक वर्ष २०२०-२१च्या जीएसटी वार्षिक रिटर्नचा तपशील फॉर्म जीएसटीआर-९ आणि फॉर्म जीएसटीआर-९सी मध्ये नवीन काय बदल करण्यात आला आहे?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 06:20 AM2021-08-02T06:20:24+5:302021-08-02T06:20:57+5:30