नवी दिल्ली : येत्या काही दिवसात तुमच्या घराचा खर्च वाढणार आहे. कारण, काही घरगुती वस्तूंच्या किमती वाढणार आहेत. नुकत्याच झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या (GST Council) 47 व्या बैठकीत दैनंदिन वापराच्या अशा काही वस्तूंवर जीएसटी (GST) लागू करण्यात आले होते, जे आधी त्याच्या कक्षेबाहेर होते. त्याचबरोबर, काही वस्तूंवर जीएसटीचा दरही वाढवण्यात आला आहे.
मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर 29 जून रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत महसूल सचिव तरुण बजाज यांनी 18 जुलैपासून जीएसटीचे नवीन दर लागू होणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे 18 जुलैपासून ट्रेट्रा पॅक असलेले दही, लस्सी यांसारखे खाद्यपदार्थ महाग होणार आहेत. यासोबतच रुग्णालयात उपचार घेणेही महागणार आहे.
यासाठी द्यावे लागतील अधिक पैसे...- याआधी टेट्रापॅक असलेले दही, लस्सी आणि बटर मिल्कवर जीएसटी लागू नव्हता. मात्र, यावर 18 जुलैपासून 5 टक्के दराने जीएसटी लागू होईल.- चेकबुक जारी करताना बँकांकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्कावर 18 टक्के जीएसटी आकारला जाईल.- रूग्णालयात 5,000 रुपये (नॉन-आयसीयू) पेक्षा जास्त भाड्याने घेतलेल्या रुमवर आता 5 टक्के जीएसटी लागू होईल.- अॅटलससह मॅप आणि शुल्कांवरही 12 टक्के दराने जीएसटी लागू होईल.- दररोज 1,000 रुपयांपेक्षा कमी भाड्याने असलेल्या हॉटेलच्या खोल्यांवर 12 टक्के जीएसटी आकारला जाईल. यापूर्वी यावर जीएसटी लागू नव्हता.- एलईडी दिवे, एलईडी दिव्यांवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात येणार आहे.- ब्लेड, कागदी कात्री, पेन्सिल शार्पनर, चमचे, काटे असलेले चमचे, स्किमर्स आणि केक-सर्व्हर इत्यादींवर 18 टक्के दराने जीएसटी लागू होईल. सध्या त्यांच्यावर 12 टक्के जीएसटी आकारला जात आहे.
हे होईल स्वस्त...- जीएसटी कौन्सिलने रोपवेद्वारे प्रवासी आणि वस्तूंच्या वाहतुकीसाठी जीएसटी दर 18 टक्क्यांवरून 5 टक्के केला आहे.- स्प्लिंट्स आणि इतर फ्रॅक्चर उपकरणे, बॉडी प्रोस्थेसेस, बॉडी इम्प्लांट्स, इंट्रा-ऑक्युलर लेन्स इत्यादींवरील जीएसटी 18 जुलैपासून 12 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत कमी केला जाईल.- ज्या ऑपरेटर्समध्ये इंधनाच्या किमतीचा समावेश आहे, त्यांच्यासाठी मालवाहतुकीच्या भाड्यांवरील जीएसटी 18 टक्क्यांवरून 12 टक्क्यांपर्यंत कमी केला जाईल.- संरक्षण दलांसाठी आयात केलेल्या काही वस्तूंवर 18 जुलैपासून IGST लागू होणार नाही.