नवी दिल्ली : काेराेना महामारीने बाधित केलेल्या २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या अखेरच्या मार्च महिन्यात १.२३ लाख काेटी रुपये एवढे विक्रमी वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) संकलन झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे, मार्च २०२१ ला संपलेल्या आर्थिक वर्षात सलग सहा महिने जीएसटी संकलन एक लाख काेटींहून अधिक झाले आहे.
केंद्रीय अर्थमंत्रालयाने मार्चमध्ये झालेल्या जीएसटी संकलनाची आकडेवारी जाहीर केली. जीएसटी संकलनात त्रुटी राहू नये, यासाठी सरकारने विविध उपाययाेजना केल्या हाेत्या. तसेच गेल्या काही महिन्यांपासून जीएसटी घाेटाळेही उघडकीस आले आहेत. त्यामुळे बनावट जीएसटी पावत्या देऊन फसवणुकीचे प्रकार काही प्रमाणात कमी झाले आहेत.
मार्च २०२१ मध्ये एकूण १ लाख २३ हजार ९०२ काेटी रुपयांचा जीएसटी संकलित झाला आहे. त्यापैकी केंद्राचा २२ हजार ९७३ आणि राज्यांचा २९ हजार ३२९ काेटी रुपये एवढा आहे. एकात्मिक जीएसटी ६२ हजार ८४२ काेटी रुपये एवढा असून, ८ हजार ७५७ काेटी रुपयांचा अधिभारही गाेळा झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षात मार्च २०२० मध्ये गाेळा झालेल्या जीएसटीपेक्षा यंदा २७ टक्के अधिक करसंकलन झाले आहे. जीएसटीच्या योग्य सवुलीसाठी गेले काही दिवस अनेक प्रयत्न सुरू असून खोटेपणा करणारी काही रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आली आहेत.
महाराष्ट्रातून सर्वाधिक करवसुली
मार्च महिन्यामध्ये झालेल्या जीएसटी संकलनामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक पहिला राहिला आहे. या महिन्यात महाराष्ट्रातून १७,०३८.०४९ कोटी रुपयांच्या जीएसटीचे संकलन झाले. मागील वर्षाच्या तुलनेमध्ये ही वाढ १४ टक्क्यांनी झालेली आहे. महाराष्ट्रापाठोपाठ गुजरातचा क्रमांक असून येथून ८,१९७.०४ कोटी रुपये जीएसटी प्राप्त झाला आहे. यानंतर कर्नाटक ( ७,९१४.९८ कोटी), तामिळनाडू ( ७,५७९.१८ कोटी) आणि उत्तर प्रदेश ( ६,२६५.०१ कोटी) या राज्यांचा क्रमांक लागतो.
तूट झाली कमी
२०१९-२० या आर्थिक वर्षात एकूण १२.२२ लाख काेटी रुपयेएवढे जीएसटी संकलन झाले हाेते. त्यातुलनेत गेल्या आर्थिक वर्षात ११.३५ लाख काेटी रुपये एवढे संकलन आहे. काेराेना महामारीमुळे आर्थिक वर्षाच्या प्रारंभी संकलन माेठ्या प्रमाणात घटले हाेते. मात्र, सप्टेंबर पासून जीएसटी संकलन वाढू लागले हाेते. जीएसटी संकलनातील तूट सुमारे ८८ हजार काेटी एवढीच राहिली आहे.
जीएसटी संकलनाचा चढता आलेख
गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने एक लाख काेटी रुपयांहून अधिक जीएसटी संकलन हाेत आहे. अर्थव्यवस्था वेगाने रुळावर येत असल्याचे हे संकेत आहेत. काेराेना महामारीमुळे आर्थिक वर्षाची सुरुवात अतिशय वाईट झाली हाेती. सरकारला एप्रिल २०२० मध्ये केवळ ३२ हजार काेटींचाच जीएसटी मिळाला हाेता. मात्र, ऑक्टाेबरपासून जीएसटी संकलनाचा आलेख चढता राहिला आहे.