Join us

जीएसटीमुळे महागाई घटेल

By admin | Published: May 22, 2017 12:51 AM

जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर महागाई २ टक्क्यांनी घटेल आणि अर्थव्यवस्थेला गती येईल, असे मत महसूल सचिव हसमुख अधिया यांनी व्यक्त केले आहे

गुलमर्ग : जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर महागाई २ टक्क्यांनी घटेल आणि अर्थव्यवस्थेला गती येईल, असे मत महसूल सचिव हसमुख अधिया यांनी व्यक्त केले आहे. स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात मोठ्या कर सुधारणांची तयारी झाली आहे, असेही ते म्हणाले. हसमुख अधिया म्हणाले की, ग्राहकांसाठी जीएसटीची माहिती देण्यासाठी एक मोहीम राबविण्यात येणार आहे. जेणेकरून व्यापाऱ्यांकडून त्यांची नव्या कराच्या नावावर लुबाडणूक होऊ नये. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अधिया म्हणाले की, जीएसटीच्या आगामी बैठकीत सोने, बिडी आणि बिस्कीट यांसारख्या उत्पादनांवर दर निश्चित केले जाणार आहेत. त्यानंतर जीएसटी १ जुलैपासून लागू करण्याचा प्रयत्न आहे. गत आठवड्यात झालेल्या जीएसटीच्या बैठकीत ५०० हून अधिक सेवा व १२०० वस्तूंचे दर निश्चित करण्यात आले आहेत. या वस्तू आणि सेवांना ५,१२,१८ आणि २८ टक्क्यांच्या टप्प्यात ठेवण्यात आले आहे. श्रीनगरहून दिल्लीला येण्यापूर्वी अधिया आणि त्यांची टीम गुलमर्ग येथे आली होती. अधिया म्हणाले की, कराचे जे दर निश्चित करण्यात आले आहेत, ते एक तर कमी करण्यात आले आहेत किंवा आहे त्याच प्रमाणात ठेवण्यात आले आहेत. जीएसटीमुळे महागाई वाढेल, असे मला वाटत नाही. महागाई वाढू नये, याकडे आम्ही विशेष लक्ष दिले आहे. याउलट महागाई २ टक्क्यांनी घटेल. सद्या करदाते आणि ग्राहक यांना एकाच विक्रीवर केंद्र व राज्य यांना कर द्यावा लागतो. त्यामुळे व्यापारी व ग्राहकांसाठी वस्तूंचे दर वाढतात. त्यामुळे महागाईही वाढते. जीएसटीत राष्ट्रीय स्तरावर एकच विक्रीकर असणार आहे. अधिया यांनी सांगितले की, अंमलबजावणीच्या काळात एखादा मुद्दा उपस्थित झाला, तर त्याचे निराकरण केले जाईल. यापुढे काय आव्हान आहे? असे विचारले असता, अधिया म्हणाले की, काही प्रलंंबित आहे, असे मला वाटत नाही. (वृत्तसंस्था)जीएसटी सरकारची सर्वात मोठी कामगिरी असेलदेशात एकच कर पद्धत लागू करणारी वस्तू व सेवाकर (जीएसटी) पद्धती, ही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारची तीन वर्षांतील सर्वांत मोठी कामगिरी ठरणार असल्याचे मत असोचेमने व्यक्त केले आहे. असोचेमने म्हटले आहे की, रेल्वे आणि वीजवितरण या क्षेत्रातील पायाभूत सुविधात होणाऱ्या सार्वजनिक गुंतवणुकीमुळे आर्थिक परिवर्तन होऊ शकते. जीएसटी म्हणजे स्वातंत्र्यानंतरची सर्वांत मोठी कर सुधारणा आहे. कररचना आणि अनुपालन, यामुळे सोपे होणार आहे. त्यामुळे व्यवसाय करणे सोपे होणार आहे. जीएसटीची अंमलबजावणी १ जुलैपासून करण्याची संपूर्ण तयारी झाली आहे. आपल्या सदस्यांकडून मिळालेल्या प्रतिक्रियांच्या आधारे असोचेमने म्हटले आहे की, किरकोळ आणि ठोकमधील महागाई दर सरकारसाठी सकारात्मक आहे. कारण महागाई चार टक्क्यांच्या आतच आहे. व्याजदर कमी ठेवण्यात आरबीआयही यशस्वी ठरलेली आहे. जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर सरकारने पुढाकार घेतलेल्या आणखी काही धोरणांची पूर्तता होणार आहे. जीएसटी आणि अन्य कर सुधारणांच्या माध्यमातून व्यापार करण्यात अधिक सहजता आणण्याचा प्रयत्न आहे, असे मत असोचेमचे अध्यक्ष संदीप जामोदिया यांनी व्यक्त केले.