GST Registrations: गेल्या अनेक महिन्यांपासून केंद्र सरकार खोट्या GST नोंदणीविरोधात विशेष मोहीम राबवत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, गेल्या दोन महिन्यांच्या विशेष मोहिमेदरम्यान जीएसटी अधिकार्यांनी 21,791 बनावट जीएसटी नोंदी शोधून काढल्या आहेत. तसेच, 24,000 कोटींहून अधिक रुपयांची जीएसटी चोरीही आढळून आली आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्यसभेत अर्थमंत्र्यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. राज्यसभा खासदार मौसम नूर यांनी अर्थमंत्र्यांना मे ते जुलै 2023 दरम्यान CBIC च्या विशेष मोहिमेअंतर्गत बनावट GST नोंदणी आणि CBIC द्वारे एकूण करचोरी यासंबंधी प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना, अर्थमंत्र्यांनी सांगितले की, राज्याच्या कर अधिकारक्षेत्रात एकूण 11392 युनिट्स आणि CBIC च्या अधिकारक्षेत्रासह 21791 युनिट्स आढळून आली आहेत, ज्यांनी बनावट जीएसटी नोंदणी दाखल केली होती. राज्यांनी एकूण 8805 कोटी रुपयांची करचोरी शोधून काढली, तर सीबीआयसीने 15205 कोटी रुपयांची करचोरी शोधू काढली. अशी एकूण 24010 कोटी रुपये शोधले आहेत.
अर्थमंत्री पुढे म्हणाल्या, प्रामाणिक करदात्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि करदात्यांना त्रासापासून वाचवण्यासाठी वेळोवेळी सूचना देण्यात आल्या असून अधिकार्यांनी अधिकारांचा वापर करताना दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. दुसर्या प्रश्नाच्या उत्तरात अर्थ राज्यमंत्र्यांनी सांगितले की, ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना 2022-23 आणि 2023-24 या आर्थिक वर्षांसाठी 1,12,332 कोटी रुपयांच्या कर थकबाकीबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.