लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर संकलनात जुलै महिन्यात वाढ नोंदविण्यात आली आहे. जुलैमध्ये १.१६ लाख कोटी रुपये एवढे जीएसटी संकलन झाले आहे. ऑक्टोबरनंतर प्रथमच जूनमध्ये जीएसटी संकलन एक लाख कोटी रुपयांच्या खाली घसरले होते. जूनमध्ये ९२ हजार ८०० कोटी रुपये एवढा जीएसटी गोळा झाला होता. त्यापूर्वी सलग ८ महिने जीएसटी संकलन १ लाख कोटींहून अधिक होते.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशभरात निर्बंध लावण्यात आले होते. त्याचा परिणाम जीएसटी संकलनावर झाला. निर्बंध शिथिल झाल्यानंतर पुन्हा आर्थिक व्यवहार सुरू झाले. त्यामुळे संकलन वाढले. जुलैमध्ये केंद्र सरकारचा जीएसटी २२ हजार १९७ कोटी, राज्यांचा जीएसटी २८ हजार ५४१ कोटी आणि आय जीएसटी ५७ हजार ८६४ कोटी रुपये एवढा गोळा झाला.
करदात्यांना दिलासा
पाच कोटी रुपयांहून अधिक उलाढाल असलेल्या करदात्यांना वार्षिक परतावा स्वप्रमाणित करता येणार आहे. ‘सीए’मार्फत सत्यापन
करण्याची त्यांना गरज राहणार नसल्याचे केंद्रीय अप्रत्यक्ष व सीमा शुल्क मंडळाने स्पष्ट केले आहे या निर्णयामुळे हजारो करदात्यांना दिलासा मिळाला आहे.
३३ टक्क्यांनी वाढ
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ३३ टक्के जास्त जीएसटी संकलन झाले आहे. आयात केलेल्या वस्तूंवरील कर संकलन ३६ टक्क्यांनी वाढले आहे. गेल्यावर्षी देशव्यापी लॉकडाऊनमुळे एप्रिल २०२० पासून सप्टेंबर २०२० पर्यंत जीएसटी संकलन एक लाख कोटी रुपयांपेक्षा कमी होते, तर यावर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा कठोर निर्बंध लावण्यात आले होते. त्यामुळे जूनमध्ये जीएसटी संकलन घटले होते.