- सी. ए. उमेश शर्माअर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, २१ सप्टेंबरला नवरात्री चालू होणार आहे. नऊ दिवस जशी आपण मनोभावे देवीची पूजा करत असतो व नऊ दिवस देवीचा गोंधळ चालू असतो, परंतु जीएसटीच्या रिटर्नचे वेगळाच गोंधळ चालू आहे. तर आज जीएसटीच्या मुख्य रिटर्नबद्दल माहिती सांग?कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, १ जुलै २०१७ पासून जीएसटी लागू झाल्यामुळे सर्व करदात्यांना मासिक रिटर्न दाखल करावे लागत आहे. नवरात्रीत जशी देवीची मनोभावे पूजा करत असतो, त्याचप्रमाणे जीएसटीमध्ये योग्य माहितीसह रिटर्न दाखल करावे लागणार आहेत. अजूनही सरकारने काही रिटर्न दाखल करावयाची मुभा दिलेली नाही. सर्वत्र रिटर्न्सचा गोंधळच उडालेला आहे. नवरात्री अनुशंगे जीएसटीतील नऊ मुख्य रिटर्नबद्दल माहिती घेऊ या.अर्जुन : कृष्णा, जीएसटीमधील मुख्य नऊ रिटर्न कोणते?कृष्ण : अर्जुना, जीएसटीमधील रिटर्न पुढीलप्रमाणे.१) फॉर्म ३बी व जीएसटीआर-१: करदात्याला जुलै २०१७ ते डिसेंबर २०१७ पर्यंत प्रत्येक महिन्यासाठी, तो महिना संपल्यानंतर, पुढील महिन्याच्या २० तारखेपर्यंत कर भरून फॉर्म ३बीमध्ये समरी रिटर्न दाखल करावे लागेल. महिन्याची एकूण विक्रीची बिलवाइज माहिती जीएसटीआर-१ मध्ये, पुढील महिन्याच्या १० तारखेपर्यंत दाखल करावी. सुरुवातीच्या काही महिन्यासाठी ही तारीख वाढविण्यात आलेली आहे.२) जीएसटीआर-२: करदात्याने खरेदीची माहिती जीएसटीआर-२ए मध्ये पुढील महिन्याच्या १५ तारखेपर्यंत तपासावी व जीएसटीआर-२ दाखल करावा.३) जीएसटीआर-३ : करदात्याने मासिक रिटर्न जीएसटीआर-३ म्हणजेच विव्रष्ठी व खरेदी याची गोळा बेरीज पुढील महिन्याच्या २० तारखेपर्यंत दाखल करावे लागेल.४) जीएसटीआर-४ : ज्या करदात्यांनी कंपोझिशन स्कीमचा पर्याय निवडलेला आहे, त्यांनी त्रैमासिक रिटर्न भरावे. कंपोझिशन करदात्याने फॉर्म जीएसटीआर-४ मध्ये त्रिमाही संपल्याच्या पुढील महिन्याचा १८ तारखेपर्यंत कर भरून रिटर्न दाखल करावे.५) जीएसटीआर-५ : अनिवासी करपात्र व्यक्तीने कर कालावधीच्या पुढील महिन्यात २० तारखेपर्यंत किंवा नोंदणीच्या वैध कालावधीच्या शेवटच्या तारखेपासून सात दिवसांच्या आत यामध्ये जे आधी असेल, त्या दिवसांपूर्वी कर भरून, फॉर्म जीएसटीआर-५ मध्ये रिटर्न दाखल करावे.६) जीएसटीआर-६ : इनपुट सेवा वितरक (आयएसडी) हे त्यांच्या शाखांना व्रष्ठेडीट हस्तांतरित करते. त्यासाठी त्यांनी पुढील महिन्याच्या १३ तारखेपर्यंत व्रष्ठेडीट वितरित करून फॉर्म जीएसटीआर-६मध्ये रिटर्न दाखल करावे.७) जीएसटीआर-७ व जीएसटीआर-८ : टीडीएससंबंधी रिटर्न हे कर कपात केलेल्या व्यक्तीने भरावे. टीडीएस रिटर्न फॉर्म जीएसटीआर-७ मध्ये पुढील महिन्याच्या १० तारखेपर्यंत दाखल करावे. टीसीएस संबंधी निवेदन हे ई-कॉमर्स आॅपरेटरव्दारे दाखल केले जावे. टीसीएसचे निवेदन हे फॉर्म जीएसटीआर- ८ मध्ये पुढील महिन्याच्या १० तारखेपर्यंत दाखल करावे, परंतु हे रिटर्न दाखल करायची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही.८) जीएसटीआर-९ : नोंदणीकृत व्यक्तीने फॉर्म जीएसटीआर-९ मध्ये वार्षिक रिटर्न दाखल करावे. ते रिटर्न आर्थिक वर्ष संपल्यानंतर पुढील वर्षाच्या ३१ डिसेंबरआधी भरावे.९) जीएसटीआर-१०: करपात्र व्यक्ती ज्याची नोंदणी रद्द किंवासमर्पित झाली, त्या व्यक्तीने फॉर्म जीएसटीआर-१०मध्ये नोंदणी रद्द झाल्याच्या तीन महिन्यांत अंतिम रिटर्न दाखल करावे.अर्जुन : कृष्णा, करदात्याने यातून काय बोध घ्यावा ?कृष्ण : अर्जुना, सध्या जीएसटीचे रिटर्न दाखल करणे सर्वांना अवघड जात आहे, तसेच देवी अंगात आल्यावर जसे होते, तसा गोंधळ जीएसटी नेटवर्कवर चालू आहे.जीएसटीचे रिटर्न दाखल होण्यासाठी नवरात्रीमध्ये देवीला प्रसन्न करावे लागेल. जसे आपण देवीची काहीही न चुकता पूजा करतो, त्याचप्रमाणे जीएसटीत योग्य माहितीसह कायद्याच्या सर्व तरतुदी समजून रिटर्न्स दाखल करावे लागतील. कारण जीएसटीमध्ये रिटर्न्स रिव्हाइज करता येत नाही.
जीएसटी रिटर्नचा गोंधळ आणि नवरात्री, करदात्यांना दाखल करावे लागतायत मासिक रिटर्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 12:44 AM