Join us  

GSTतून भरघोस कमाई! फेब्रुवारी महिन्यात १.४९ लाख कोटींचे कर संकलन; १२ टक्क्यांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2023 5:57 PM

जीएसटी लागू झाल्यानंतर फेब्रवारी महिन्यात सर्वाधिक उपकर संकलन झाल्याचे सांगितले जात आहे.

GST News: महागाई, बेरोजगारी यांसह अनेकविध मुद्द्यांवरुन केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका होताना दिसत आहे. मात्र, यातच केंद्र सरकारसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटीतून केंद्र सरकारची भरघोस कमाई झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात १.४९ लाख कोटी रुपयांचे कर संकलन झाले. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात जीएसटीच्या संकलनात १२ टक्क्यांची वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. 

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यात जीएसटी कर संकलन ०१,४९,५७७ कोटी रुपये इतके झाले. मागील वर्षाच्या तुलनेत १२ टक्क्यांची वाढ दिसून आली. गेल्यावर्षी फेब्रुवारी २०२२ मध्ये ०१,३३,०२६ रुपयांचे जीएसटी कर संकलन झाले होते. जानेवारीमध्ये जीएसटी संकलनात आतापर्यंतची दुसरी सर्वांत मोठी वाढ झाली होती. सलग ११व्या महिन्यात १.५५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त GST महसूल प्राप्त झाला. जानेवारी महिन्यात सरकारला ०१,५५,९२२ कोटी रुपये म्हणजेच १.५५ लाख कोटी रुपयांचे जीएसटी महसूल मिळाला होता.

मागील १२ महिन्यांच्या तुलनेत हा महसूल अधिक 

अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, एकूण महसूल संकलनात CGST सुमारे २२,६६२ कोटी रुपये आहे. तर, SGST ३४,९१५ कोटी रुपये आहे. एकूण संकलनात IGST चा वाटा ७५,०६९ कोटी रुपये (पैकी माल आयातीवर गोळा केलेले ३५,६८९ कोटी) होता. उपकर सुमारे ११,९३१ कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर जमा झालेले ७९२ कोटी रुपये) आहे. सलग १२ महिने जीएसटी संकलन हे ०१ लाख ४० हजार कोटींपेक्षा अधिक आहे. यंदाचा आकडा हा ०१,४९,५७७ कोटींवर आला आहे. मागील १२ महिन्यांच्या तुलनेत हा महसूल अधिक आहे. 

GST लागू झाल्यानंतर सर्वाधिक उपकर संकलन

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने पुढे सांगितले की, या वर्षी फेब्रुवारीमध्ये वस्तूंच्या आयातीतून मिळणारा महसूल ६ टक्के जास्त आहे. देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) महसूल १५ टक्के जास्त आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये ११,९३१ कोटी रुपयांचे उपकर संकलन झाले, जे GST लागू झाल्यानंतरचे सर्वाधिक आहे. फेब्रुवारीमध्ये आंतरराज्य विक्रीच्या सेटलमेंटनंतर केंद्राचा एकूण महसूल ६२,४३२ कोटी रुपये झाला आहे. तसेच राज्याचा एकूण महसूल ६३,९६९ कोटी रुपये झाला आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :जीएसटी