नवी दिल्ली : वस्तू व सेवाकराला (जीएसटी) एक वर्ष पूर्ण झाले आहे. जीएसटीमुळे कर संकलनात वाढही झाली आहे. तथापि, सरकारचे वार्षिक करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्यता अजूनही कमीच आहे. जूनला संपलेल्या तिमाहीत जीएसटीचे मासिक कर संकलन ९७,५४0 कोटी रुपये आहे. सरकारचे उद्दिष्ट मात्र १.१ लाख कोटी रुपयांचे आहे.जीएसटीच्या अनुपालनाचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे महसूल अपेक्षेपेक्षा कमी आहे, असे सूत्रांनी सांगितले. येणारे वर्ष हे निवडणुकांचे आहे. त्यामुळे मोदी सरकारने कल्याणकारी योजनांवरील खर्च वाढविला आहे. खर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी सरकारने वित्तीय तुटीचे उद्दिष्ट ३ टक्क्यांवरून ३.३ टक्क्यांवर नेले आहे. त्यामुळे रोखे परताव्यावर आधीच दबाव आहे.मुंबईतील कोटक महिंद्रा बँकेचे विश्लेषक सुवोदीप रक्षित आणि उपासना भारद्वाज यांनी सांगितलेकी, जीएसटी महसूल उद्दिष्टापेक्षा कमी असल्यामुळे अर्थसंकल्पीयतूट ३.५ टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे.ई-वे बिलाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर जीएसटी संकलन वाढेल. अर्थसंकल्पीय उद्दिष्टपूर्ती होण्यास त्यामुळे मदत होईल, असे नोमुरा होल्डिंगच्या विश्लेषकांनी सांगितले. केंद्रीय वित्तमंत्री पीयूष गोयल यांनी रविवारी सांगितले होते की, वित्त वर्षाच्या आगामी काळात कर संकलनात वाढ होईल. जीएसटीद्वारे सरकार १३ हजार कोटी उभे करण्याची शक्यता आहे.वाढ होत आहे, पण...मुंबईस्थित व्यवसाय माहिती कंपनी ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ने (सीएमआयई) जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की, कर-ते-जीडीपी गुणोत्तर गेल्या वित्त वर्षात ११.६ टक्के झाले. या गुणोत्तराचा हा सार्वकालिक उच्चांक ठरला आहे. पीसीडब्ल्यू इंडियाचे भागीदार प्रतीक जैन यांनी सांगितले की, जीएसटीच्या करवसुलीत निश्चितपणे वाढ होत आहे. तथापि, २0१८-१९च्या अर्थसंकल्पीय उद्दिष्टापेक्षा ते अजूनही कमीच आहे.
‘जीएसटी’चा महसूल अजूनही अर्थसंकल्पीय उद्दिष्टापेक्षा कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2018 4:42 AM