लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली
सोमवारपासून (१८ जुलै) अनेक गरजेच्या वस्तू पुन्हा एकदा महाग होणार आहेत. गेल्या महिन्यात जीएसटी परिषदेच्या बैठकीत अनेक खाद्यपदार्थ व वस्तूंवरील जीएसटी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी आजपासून करण्यात येणार आहे. यामुळे दही, लस्सी, तांदूळ, पीठ, पनीर, मासे यासह अनेक जीवनावश्यक वस्तू महाग होणार आहेत.
रुग्णालयात उपचार घेणे महागणार
रुग्णालयाने ५ हजार रुपयांपेक्षा अधिक दराने खोली उपलब्ध करून दिल्यास त्या खोलीवर ५ टक्के दराने जीएसटी द्यावा यापुढे लागेल.
हॉटेल रूमसाठी मोजा अधिक पैसे
यापूर्वी, १ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीच्या हॉटेलच्या खोल्यांवर जीएसटी नव्हता, आता यावर १२ टक्के जीएसटी.
दुग्धजन्य पदार्थ आणि पीठ महाग
दही, लस्सी आणि बटर मिल्कवर ५ टक्के जीएसटी लागेल. ब्रँड नसलेले प्री-पॅकेज केलेले आणि प्री-लेबल केलेले पीठ आणि डाळींवरही ५ टक्के जीएसटी लावला जाईल.
एलईडी बल्ब महागणार
ब्लेड, कात्री, पेन्सिल शार्पनर, नकाशे, चमचे, काटे चमचे, स्किमर, केक सर्व्हिसवर जीएसटी वाढवला आहे. त्यावर १८% दराने जीएसटी वसूल केला जाईल. एवढेच नाही तर एलईडी बल्बवर १८% जीएसटी आकारण्यात येईल.
गोदामात माल ठेवणेही महाग
गोदामात ड्रायफ्रूट्स, मसाले, गूळ, कापूस, चहा, कॉफी इत्यादी ठेवणेही महाग होणार आहेत. त्यांच्यावर १२ टक्के दराने जीएसटी आकारला जाईल.