- सी. ए. उमेश शर्मा
अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, पितृपक्ष सुरू झाला आहे. यात आपण पूर्वजांची आठवण काढतो. जीएसटीच्या शांतीसाठी काय करावे? कारण रिटर्न भरण्यास प्रचंड त्रास होत आहे?
कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, होय, पितृपक्षात आपण पूर्वजांची आठवण करतो. त्यांची शांती करतो. जुने कायदे जाऊन जीएसटी लागू झाला. म्हणजेच व्हॅट, सेवाकर, एक्साइज ड्युटी, कस्टम ड्युटी, इत्यादी १७ कायदे हे जीएसटीचे पूर्वज आहेत. त्यांच्यामुळे खूप अशांतता पसरली आहे. म्हणून त्यांची शांती (अडचण दूर) करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच जीएसटीएन कॉम्प्युटर नेटवर्कचीही शांती करावी लागेल. यजमान करदाता हैराण आणि पंडितजी (करसल्लागार) तर खूपच वैतागलेले आहेत या जीएसटीच्या पूजापाठ करण्याच्या विधीपायी अर्थातच रिटर्र्न भरण्याच्या तांत्रिक त्रासापायी. अनेकांंचे अजून पहिलेच (जुलै २०१७ चेच) रिटर्न काही अपलोड होईना. पुढच्या येणाºया रिटर्नबद्दल सांगणे तर अवघडच आहे.
अर्जुन : कृष्णा, जीएसटीमध्ये एक्साइजची शांती करून पुण्य (क्रेडिट) मिळण्यासाठी काय करावे?
कृष्ण : अर्जुना, ३० जूनच्या एक्साइजच्या रिटर्नमध्ये कॅरी फॉरवर्ड केलेल्या सेनव्हॅटच्या रकमेचे, एक्साइज कायद्यांतर्गत भांडवली वस्तूंवरचे ५० टक्के क्रेडिट, फॉर्म टीआरएएन-१मध्ये क्रेडिट घेता येईल. जीएसटीच्या नोंदणीमध्ये एक्साइजचा नोंदणी क्रमांक टाकलेला असेल तरच एक्साइज ड्युटीचे क्रेडिट मिळेल. ३० जूनच्या दिवशी स्टॉकमध्ये असलेल्या वस्तूंंचे जर एक्साइज ड्युटी भरल्याचे इन्व्हाइस असेल तर १०० टक्के क्रेडिट मिळेल अन्यथा ४० टक्के किंवा ६० टक्के सीजीएसटीचे क्रेडिट मिळेल. अर्थात अनेक अडचणींचा सामना करूनच क्रेडिट करदात्यास मिळेल.
अर्जुन : कृष्णा, जीएसटीमध्ये सर्व्हिस टॅक्सची शांती करून पुण्य (क्रेडिट) मिळण्यासाठी काय करावे?
कृष्ण : अर्जुना, सर्व्हिस टॅक्सच्या रिटर्नमध्ये असलेल्या कॅरी फॉरवर्ड रकमेचे क्रेडिट घेता येईल. तसेच फॉर्म जीएसटी टीआरएएन-१ मध्ये अग्रीम सेवाकर भरल्यास तेही कॅरी फॉरवर्ड करता येईल.
अर्जुन : कृष्णा, जीएसटीमध्ये व्हॅटची शांती करून पुण्य (क्रेडिट) मिळण्यासाठी काय करावे?
कृष्ण : अर्जुना, व्हॅटच्या रिटर्नमध्ये जर काही रक्कम कॅरी फॉरवर्ड असेल तर तिचे क्रेडिट एसजीएसटीसमोर मिळेल.
२०१५ पासून मिळालेल्या सर्व सी फॉर्म, एच फॉर्म आणि एफ फॉर्मची माहिती द्यावी लागेल. फॉर्म टीआरएएन-१मध्ये विभेदक दायित्वातून व्हॅटच्या रिटर्नमध्ये कॅरी फॉरवर्ड केलेली रक्कम वजा करून मिळालेल्या रकमेचे क्रेडिटमध्ये मिळेल.
अर्जुन : कृष्णा, करदात्याने यातून काय बोध घ्यावा ?
कृष्ण : अर्जुना, जीएसटीच्या पूर्वजांची अजूनही शांती झालेली दिसत नाहीये. सगळीकडे अशांतताच आहे. जीएसटीचे नेटवर्कही त्रास
देत आहे आणि रिटर्न दाखल
करण्यात अनेक अडचणी येत आहेत. म्हणून वारंवार तारीख वाढवली जात आहे.
लवकरात लवकर जीएसटीच्या पूर्वजांची शांती केली नाही तर खूप उद्रेक होईल. जीएसटीचे पितृपक्ष, करदाता आणि करसल्लागार दक्ष, सरकारी दुर्लक्ष चालणार नाही. जीएसटीआर-१ ची शांती (विक्री अपलोड) झाल्यावरच जीएसटीआर- २मध्ये पुण्य (खरेदीचे क्रेडिट) मिळेल.
करनीती - जीएसटीचा पितृपक्ष; करदाता आणि करसल्लागार दक्ष
पितृपक्ष सुरू झाला आहे. यात आपण पूर्वजांची आठवण काढतो. जीएसटीच्या शांतीसाठी काय करावे? कारण रिटर्न भरण्यास प्रचंड त्रास होत आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 01:17 AM2017-09-11T01:17:17+5:302017-09-11T01:17:40+5:30