जळगाव : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडवा सणाच्या मुहूर्तावर सोने-चांदीसह वाहन आणि घर खरेदीसाठी बाजारात आज मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची अपेक्षा असून बाजारपेठा ग्राहकांच्या स्वागतासाठी सजल्या आहेत. राज्यात सोने-चांदीच्या खरेदीची उलाढाल तीन ते साडेतीन हजार कोटींच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे.
सोने-चांदीशिवाय या मुहूर्तावर दुचाकी, चारचाकी गाड्या खरेदीला लोक प्राधान्य देतात. अनेकांचे स्वत:च्या घरात जाण्याचे स्वप्न असते आणि गुढीपाडवा सणाचा मुहूर्त त्यासाठी उत्तम मानला जातो. त्यामुळे यंदाही वाहन आणि रिअल इस्टेट व माेबाइल बाजारात चैतन्याचे वातावरण आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना व सवलतींचा वर्षाव सुरू आहे. या दोन्ही बाजारात यंदा मोठी उलाढाल अपेक्षित आहे.
गेल्या १० ते १२ दिवसांपासून सोने-चांदीचे भाव वाढत असले तरी सुवर्ण बाजारात खरेदीचा उत्साह कायम आहे. गुढीपाडवा सणाच्या दोन दिवस अगोदरच सोने ६० हजारांच्या पुढे गेल्याने मुहूर्तावर भाववाढ होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. असे असले तरी ग्राहकांना दर कमी होण्याचा सुखद धक्का अपेक्षित आहे. भारतात प्रत्येक सण, मुहूर्ताला महत्त्व दिले जात असल्याने बुधवारीही मोठ्या प्रमाणात सोने-चांदीची खरेदी होऊन राज्यात तीन हजार कोटी रुपयांहून अधिक उलाढाल होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
कलाकुसरीच्या दागिन्यांना पसंतीसोने खरेदी करताना सर्वच प्रकारच्या दागिन्यांना मागणी दिसून येत आहे. मुहूर्तावर खरेदी करायची असल्याने अनेक जण जुने दागिने मोड देऊन मंगळसूत्र, अंगठी व इतर दागिने करण्यास पसंती देतात. कलाकुसरीच्या बारीक सोनपोत, कर्णफुले, गव्हाळ मणी, डिझाईनर पँडल या सोबत पुरुषांच्या सोनसाखळीचा सध्या अधिक ट्रेंड असल्याने त्यांची खरेदी वाढू शकते. अनेक जण आपापल्या बजेटनुसार दागिन्यांची खरेदी करीत असले आणि बजेट नसले तरी किमान एक ग्रॅम सोने तरी खरेदी करून ठेवावे, यावर भर दिला जातो.
- भाव काहीही असो, खरेदी होणार जोमात : गुढीपाडव्याच्या एक दिवस अगोदर मंगळवार, २१ मार्च सोन्याच्या भावात ७०० रुपयांची घसरण होऊन ते ५९ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर आले. आता मुहूर्तावर काय भाव राहतात याकडे लक्ष असले तरी खरेदी मात्र जोरात होण्याचा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी वर्तविला आहे.