Join us

व्वा...! 'या' कंपनीनं दिवाळी गिफ्ट म्हणून कर्मचाऱ्यांना वाटल्या इलेक्ट्रिक स्कूटर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2021 9:04 PM

"इंधनाच्या वाढत्या किमती आणि इतर काही गोष्टी लक्षात घेत, आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिक स्कुटर भेट म्हणून देण्याचा निर्णय घेतला," असे कंपनीचे संचालक सुभाष डावर यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली - दिवाळी निमित्त सुरतच्या एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिक स्कूटर भेट म्हणून दिल्या आहेत. पेट्रोलच्या गगनाला भिडलेल्या किमती आणि पर्यावरणाची होणारी हानी, लक्षात घेत कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिक स्कूटर भेट देणाऱ्या सुरतच्या या प्रसिद्ध कंपनीचे नाव अलायन्स ग्रुप, असे आहे. "इंधनाच्या वाढत्या किमती आणि इतर काही गोष्टी लक्षात घेत, आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिक स्कुटर भेट म्हणून देण्याचा निर्णय घेतला," असे कंपनीचे संचालक सुभाष डावर यांनी म्हटले आहे.

ग्रुपमध्ये एम्ब्रॉयडरी मशीनचा व्यवसाय पाहणाऱ्या सुभाष यांचा मुलगा चिराग यांनी सांगितले, की या दिवाळीत कंपनीने 35 कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिक स्कूटर दिल्या आहेत. या स्कुटर पेट्रोलवर चालणाऱ्या बाइक्सच्या बदल्यात देण्यात आल्या आहेत. असे करण्यामागे अनेक कारणे आहेत. कंपनीचे म्हणणे आहे की, गेल्या काही दिवसांत पेट्रोलच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. हे केवळ माध्यमांपूरतीच मर्यादित नाही, तर कंपनीवरही याचा मोठा परिणाम झाला आहे.

इंधनाची दरवाढ पाहता, कंपनीने पेट्रोल बाईक चालविणाऱ्या कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिक स्कूटर भेट देण्याचा निर्णय घेतला. यामुळे इंधनावरील खर्च तर वाचेलच, पण पर्यावरणाचेही रक्षण होईल. हे दुहेरी लाभासारखे आहे. दिवाळीनिमित्त गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कर्मचाऱ्यांमध्ये या स्कूटर्सचे वाटप करण्यात आले.

टॅग्स :गुजरातबाईकस्कूटर, मोपेडपेट्रोल