Join us

गुजरात सरकारचा मोठा निर्णय! सर्व सरकारी कर्मचारी आता Jio वापरणार; Vi ला केला रामराम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2023 9:00 PM

Gujarat Government Jio News: रिलायन्स जिओशी झालेल्या करारानंतर सरकारी कर्मचाऱ्यांनी यापुढे Vi ऐवजी Jioची सेवा सुरू करावी, अशी अधिसूचना गुजरात सरकारने काढली आहे.

Gujarat Government Jio News: गेल्या काही महिन्यांपासून टेलिकॉम क्षेत्रातील स्पर्धा आणखी तीव्र होताना दिसत आहे. 5G मुळे या क्षेत्रात मोठे बदल होण्याचे संकेत आहेत. आपले ग्राहक टिकवण्यासाठी कंपन्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र, यातच गुजरात सरकारने एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. यानुसार आता सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना Reliance Jio ची सर्व्हिस दिली जाणार आहे. विद्यमान Vodafone-Idea म्हणजेच Vi ची सेवा आता बंद केली जाणार आहे. 

गुजरात सरकारचे कर्मचारी Vi ची सेवा वापरत होते. आता मात्र, Viची सर्व्हिस बंद करण्यात येणार आहे. सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचे नंबर आता Reliance Jio वर ट्रान्सफर करण्यात येणार आहेत. गुजरातमध्ये आतापर्यंत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सरकारी नंबर व्होडाफोन-आयडिया कंपनीकडून चालवले जात होते. कर्मचारी Viची पोस्टपेड सेवा वापरत होते. पण आता गुजरात सरकारने एक अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेत स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, तात्काळ प्रभावाने व्होडाफोन-आयडियाच्या जागी रिलायन्स जिओ नंबर वापर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. 

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केवळ ३७.५० रुपयांचा नवीन प्लान!

गुजरातमधील सरकारी कर्मचाऱ्याला रिलायन्स जिओचा मंथली प्लान ३७.५० रुपायांमध्ये मिळेल. या प्लानद्वारे कोणत्याही मोबाइल ऑपरेटर, लँडलाइनवर मोफत कॉलिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासोबतच युझरला दर महिन्याला ३ हजार SMS मोफत मिळणार आहेत. हे एसएमएस वापरल्यानंतर, प्रत्येक एसएमएससाठी ५० पैसे शुल्क आकारले जाईल. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय SMSसाठी, प्रति संदेश १.२५ रुपये शुल्क आकारले जाईल. रिलायन्स जिओसोबत झालेल्या करारानुसार, सरकारी कर्मचाऱ्यांनाही या प्लॅन अंतर्गत दरमहा ३० जीबी 4G डेटा उपलब्ध करून दिला जाणार आहे. ही मर्यादा संपल्यानंतर, डेटा वाढवण्यासाठी प्लॅनमध्ये २५ रुपये खर्च करावे लागतील. या अतिरिक्त शुल्काद्वारे ६० जीबीपर्यंत 4G डेटा उपलब्ध होईल. 4G अमर्यादित प्लॅन हवा असेल तर, दरमहा १२५ रुपये मोजावे लागतील. तसेच सरकारी कर्मचाऱ्याला 4Gच्या किमतीत 5G प्लॅन मिळेल.

दरम्यान, आतापर्यंत गुजरात सरकार आपल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी फक्त Viची पोस्टपेड सेवा वापरत होती. यात बदल करून Jioच्या सेवा सुरू करण्याचा हा निर्णय अचानक समोर आला आहे. सरकारी अधिसूचनेमध्ये असे म्हटले आहे की, जे कर्मचारी आधीपासून Vi नंबर वापरत होते, ते सरकारी नंबर मोबाइल पोर्टेबिलिटीद्वारे जिओमध्ये हस्तांतरित करून वापरण्यात येतील. म्हणजेच नंबर बदलणार नाही. 

टॅग्स :गुजरातरिलायन्स जिओव्होडाफोन आयडिया (व्ही)