Gujarat Titans IPL Team : अंबानी समूहानंतर आता अदानी समूहदेखील IPL मध्ये उतरण्याच्या तयारीत आहे. खाजगी इक्विटी फर्म CVC कॅपिटल पार्टनर्स, Gujarat Titans संघातील आपला हिस्सा विकण्याच्या तयारीत आहे. याबाबत अदानी ग्रुप आणि टोरेंट ग्रुपशी चर्चा सुरू आहे. मीडिया रिपोर्टनुसार, CVC संपूर्ण शेअर नाही, तर फक्त कंट्रोलिंग स्टेक विकू इच्छित आहे. सीव्हीसीला उर्वरित शेअर्स स्वतःकडे ठेवायचे आहेत.
फेब्रुवारी 2025 पर्यंत हा करार होईल
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नवीन IPL संघांना फेब्रुवारी 2025 पर्यंत त्यांचे स्टेक विकण्यास मनाई केली आहे. त्यामुळे, फेब्रुवारी 2025 मध्ये बंदी उठल्यानंतर हा करार होऊ शकतो. तीन वर्षे जुन्या गुजरात टायटन्स फ्रँचायझीचे मूल्य $1 अब्ज ते $1.5 बिलियन दरम्यान असण्याची अपेक्षा आहे. 2021 मध्ये CVC कॅपिटल पार्टनर्सने ही फ्रँचायझी 5,625 कोटी ($745 दशलक्ष) मध्ये खरेदी केली होती.
CVC नफा कमावल्यानंतर शेअर्स विकण्याचा प्रयत्न करेल
2021 मध्ये गुजरात टायटन्स संघ खरेदी करण्याची संधी गमावल्यानंतर, अदानी आणि टोरेंट समूह गुजरात टायटन्समधील मोठा हिस्सा खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे, नफा कमावल्यानंतर सीव्हीसीलाही आपला हिस्सा विकायचा आहे. मात्र, या तिघांनीही याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
CVC ही क्रीडा क्षेत्रात गुंतवणूक करणारी मोठी कंपनी
टोरेंटपूर्वीच अदानी समूहाने क्रिकेट विश्वात प्रवेश केला आहे. ग्रुपने महिला प्रीमियर लीग (WPL) आणि UAE च्या आंतरराष्ट्रीय लीग T20 मध्ये संघ खरेदी केले आहेत. 2023 मध्ये, अदानी समूहाने 1,289 कोटी रुपयांची बोली लावून अहमदाबादची WPL फ्रँचायझी मिळवली होती. तर, CVC ही 193 अब्ज रुपयांची मालमत्ता असलेली मोठी कंपनी आहे आणि ती क्रीडा क्षेत्रात पैसे गुंतवते. कंपनीने ला लीगा, प्रीमियरशिप रग्बी, व्हॉलीबॉल वर्ल्ड आणि महिला टेनिस असोसिएशन यांसारख्या क्रीडा संघटनांमध्ये पैसे गुंतवले आहेत.
गुजरात टायटन्स आणि नीता अंबानी 'शत्रू'?
आयपीएलमध्ये प्रवेश केल्यानंतर गुजरात टायटन्सने संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे सोपवले होते. याआधी हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सकडून खेळायचा. पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने पहिल्याच सत्रात विजेतेपद पटकावले होते. यानंतर नीता अंबानी यांच्या मालकीच्या मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्समधून हार्दिक पांड्याला परत बोलावून मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सोपवले. आता तोच संघ विकत घेण्याच्या शर्यतीत अदानी ग्रुप सामील झाला आहे.