इंदूर : मध्य प्रदेशातील रबी हंगामातील गहू उत्पादन १५ टक्के वाढीसह १८५ लाख टनांवर पोहोचण्याचा अंदाज आहे. या हंगामात गव्हाचे उत्पादन २०० लाख टनांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती; परंतु अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे गव्हाच्या रेकॉर्ड ब्रेक उत्पादनाचा अपेक्षाभंग झाला आहे. राज्याचे शेतकरी कल्याण व कृषी विकास विभागाचे संचालक डॉ. डी. एन. शर्मा म्हणाले की, रबी हंगामात राज्यात एकूण ५९ लाख हेक्टर शेतीमध्ये गव्हाचे पीक घेण्यात आले. यातून एकूण १८५ लाख टन उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. या अगोदर विभागाने डिसेंबर महिन्यात गव्हाचे उत्पादन १९० लाख टन होईल, असा अंदाज वर्तविला होता. विक्रमी उत्पादनासह पंजाबला मागे टाकण्याची दाट शक्यता होती. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. याचा फटका गव्हाच्या पिकाला बसला. शर्मा म्हणाले की, रबी हंगामाच्या सुरुवातीला २०० लाख टन गव्हाचे उत्पादन होण्याची शक्यता होती; परंतु ऐनवळी अवकाळी पावसाने घात केला. कृषितज्ज्ञांनी सांगितले की, मान्सूनमुळे राज्यातील बहुतांश शेतकर्यांनी गव्हाची पेरणी वेळे अगोदरच केली होती. त्यामुळे गव्हाचे पीक चांगल्या स्थितीत होते. कडाक्याच्या थंडीमुळे पिकाला अजून बळकटी मिळाली; परंतु फेब्रुवारी व मार्चदरम्यान प्रतिकूल वातावरणामुळे गव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मागील रबी हंगामात मध्य प्रदेशात ५४ लाख हेक्टर शेतीत गव्हाचे पीक घेण्यात आले. यातून १६१ लाख टन विक्रमी गव्हाचे उत्पादन झाले होते. (वृत्तसंस्था)
गारपीट व अवकाळीचा गव्हाला फटका
By admin | Published: May 15, 2014 3:47 AM