Join us

हजारी आपटीने सेन्सेक्स सात महिन्यांच्या नीचांकावर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 2:10 AM

विविध आस्थापनांचे अपेक्षेहून कमी आलेले निकाल, रुपयाच्या घसरत्या किंमतीतही देशाची कमी झालेली निर्यात, सेवा क्षेत्राची निराशाजनक कामगिरी आणि पहिल्या सहामाहीअखेर अर्थसंकल्पीय अंदाजापेक्षा वाढलेली वित्तीय तूट या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात गतसप्ताह निराशाजनक राहिला.

- प्रसाद गो. जोशी

विविध आस्थापनांचे अपेक्षेहून कमी आलेले निकाल, रुपयाच्या घसरत्या किंमतीतही देशाची कमी झालेली निर्यात, सेवा क्षेत्राची निराशाजनक कामगिरी आणि पहिल्या सहामाहीअखेर अर्थसंकल्पीय अंदाजापेक्षा वाढलेली वित्तीय तूट या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात गतसप्ताह निराशाजनक राहिला. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी सात महिन्यांमधील नीचांक गाठले आहेत.मुंबई शेअर बाजारात गतसप्ताहात एका दिवसाचा अपवाद वगळता अस्वलाचेच राज्य दिसून आले. संवेदनशील निर्देशांक मागील सप्ताहापेक्षा वाढीव पातळीवर खुला झाला. त्यानंतर तो ३४,७४८.६९ ते ३३,२९१.५८ अंशांदरम्यान हेलकावे खात सप्ताहाच्या अखेरीस ३३,३४९.३१ अंशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकापेक्षा त्यात ९६६.३२ अंश म्हणजेच २.८ टक्के घट झाली आहे. चालू महिन्यात हा निर्देशांक ८ टक्कयांनी खाली आला आहे.राष्टÑीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) १०,०३०.०० अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहापेक्षा तो २७३.५५ अंशांनी खाली आला आहे. त्याने १० हजार अंशांची टिकवून ठेवलेली पातळी हीच काय ती समाधानाची बाब मानावी लागेल. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या बाजाराच्या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये या सप्ताहातही घटच झाली. मिडकॅप निर्देशांक १८८.१५ अंशांनी घसरून १३,८७०.१५ अंशांवर बंद झाला. स्मॉलकॅप निर्देशांक १३,५९७.६४ अंशांवर बंद झाला आहे. गतसप्ताहापेक्षा त्यात ४८५.२८ अंशांची मोठी घट झाली आहे.जगभरातील शेअर बाजारांमध्ये असलेल्या निराशेचा फटका भारतीय बाजाराला बसत आहे. त्याबरोबरच देशाच्या आर्थिक प्रकृतीची चिंताही बाजाराला सतावत आहे. सातत्याने कमी होणारी रुपयाची किंमत आणि या पार्श्वभूमीवरही कमी झालेली निर्यात यामुळे देशाच्या चालू खात्यावरील तूट वाढत आहे. पहिल्या सहामाहीत ही तूट ९५.३ टक्के झाली आहे. विविध आस्थापनांचे निकालही अपेक्षेप्रमाणे आलेले नाहीत.निफ्टीतील सर्व ५० आस्थापनांचे भाव घटलेराष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक निफ्टीमधील सर्वच्या सर्व ५० आस्थापनांच्या समभागांचे दर ५० दिवसांच्या सरासरीहून घटले आहेत. २००८मध्ये आलेल्या जागतिक आर्थिक संकटानंतर प्रथमच अशी स्थिती गतसप्ताहामध्ये निर्माण झाली आहे.कोणत्याही आस्थापनेच्या समभागांची ५० दिवसांच्या किंमतीची सरासरी ही शेअर बाजारामधील एक मापक मानले जाते. त्यापेक्षा कमी अथवा जास्त किंमतीला होणारे व्यवहार हे अनुक्रमे मंदी अथवा तेजी दाखवित असतात.चालू वर्षाच्या २८ आॅगस्ट रोजी निफ्टी ११७३९.८० अशा सार्वकालीन उच्चांकावर पोहोचला होता. त्या दिवशी निफ्टी मधील ५० पैकी ४० समभागांनी ५० दिवसांच्या सरासरी किंमतीपेक्षा अधिक किंमत नोंदविली होती. सध्या मात्र बाजारात मंदीची लाट दिसून येत आहे.

 

टॅग्स :शेअर बाजार