Defence Ministry Tender : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) च्या शेअर्समध्ये मंगळवारच्या(दि.18) ट्रेडिंग सत्रात कमालीची वाढ झाली. मंगळवारी सकाळी एचएएलचे शेअर्स 260 रुपयांच्या वाढीसह 5460 रुपयांवर उघडले. यानंतर शेअरमध्ये वाढ झाली. संरक्षण मंत्रालयाने एचएएलसोबत 156 लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (LCH) साठी करार केला आहे. हा करार 45000 कोटी रुपयांचा आहे. पीएमओच्या अधिकृत एक्स अकाउंटवर ही माहिती दिल्यानंतर शेअर वधारले.
लष्करासाठी 90 आणि हवाई दलासाठी 66 हेलिकॉप्टर
मिळालेल्या माहितीनुसार, संरक्षण मंत्रालयाने 156 लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (LCH) खरेदीसाठी हा करार केला आहे. यातील 90 हेलिकॉप्टर भारतीय लष्करासाठी तर 66 हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलासाठी असतील. भारतीय हवाई दल आणि भारतीय लष्कराकडून खरेदी करण्यात येणाऱ्या हेलिकॉप्टरची किंमत 45,000 कोटी रुपये आहे.
कंपनीच्या शेअर्सची स्थिती
मंगळवारी सकाळी 5460 रुपयांवर उघडल्यानंतर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) च्या शेअर्समध्ये सतत वाढ होत आहे. शेअरची 52 आठवड्यांची उच्च पातळी 5,565 रुपये आहे. या वाढीसह कंपनीचे मार्केट कॅप 3,71,136 कोटी रुपये झाले आहे.
LCH चे वैशिष्ट्ये
एलसीएचला 'प्रचंड' नावानेही ओळखले जाते. हे जगातील एकमेव लढाऊ हेलिकॉप्टर आहे, जे 5000 मीटर (16,400 फूट) उंचीवर उडू शकते. या गुणवत्तेमुळे ते सियाचीन ग्लेशियर आणि पूर्व लडाखच्या कमी उंचीच्या भागात उड्डाण करण्यास सक्षम आहे. याद्वारे हवेतून जमिनीवर आणि हवेतून हवेत मारा करता येतो. एवढंच नाही, तर ते शत्रूच्या हवाई संरक्षण ऑपरेशनलाही नष्ट करू शकते.