नवी दिल्ली : डेबिट आणि क्रेडिट कार्ड सेवा देणाऱ्या व्हिसा आणि मास्टरकार्ड या बहुराष्ट्रीय कंपन्यांचा भारतातील बाजार हिस्सा घसरत चालला असून, भारताच्या स्वदेशी युनिफाइड पेमेंटस् इंटरफेसद्वारे (यूपीआय) झालेल्या व्यवहारांतील रक्कम गेल्या महिन्यात डेबिट व क्रेडिट कार्डच्या एकूण व्यवहारांच्या वाढून जवळपास अर्धी झाली आहे.
रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली. मोबाईल अॅपचा वापर करणाºया रिटेलरांसाठी यूपीआय विशेष उपयुक्त सिद्ध झाले आहे. यूपीआयमुळे रिटेलरांना ग्राहकांच्या थेट बँक खात्यातून पैसे घेता येतात. विमान वाहतूक कंपन्या आणि किरकोळ विक्री क्षेत्रातील कंपन्यांना यूपीआयद्वारे व्यवहार करणे अधिक सोपे झाले आहे. ग्राहकांसाठीही हा व्यवहार सुटसुटीत व सोपा असतो. २०१६ मध्ये भारतीय बँकांच्या शिखर संस्थेने यूपीआय सुरू केले होते. याउलट मास्टरकार्ड गेल्या तीन दशकांपासून या व्यवसायात आहे.
अमेरिकेतील फिडेलिटी नॅशनल इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस आयएनसीने डिसेंबर २०१७ मध्ये एका अहवालात यूपीआयची प्रशंसा केली आहे. यूआयमुळे वास्तव काळात (रिअल टाइम) व्यवहार होत असल्यामुळे ते वेगाने लोकप्रिय होत आहे, असे संस्थेने म्हटले आहे. ‘फिडेलिटी नॅशनल’ने ४० देशांतील पेमेंट तंत्रज्ञान यंत्रणांचा अभ्यास केला होता. त्यात
यूपीआय पाच गुणांसह पहिल्या स्थानी आले होते. चीनच्या इंटरनेट बँकिंग पेमेंट सिस्टिमला दोन गुण;
तर केनियाच्या पेसालिंकला चार गुण मिळाले होते.
बड्या कंपन्यांत यूपीआयच
अॅमेझॉन, जेट एअरवेज, ओला, उबर टेक्नॉलॉजीज, बिग बाजार आणि पेटीएम मोबाइल सोल्युशन्स यांसारख्या विविध क्षेत्रांतील कंपन्यांनी आपल्या अॅपला यूपीआयशी जोडून घेतले आहे.
‘व्हॉट्सअॅप पे’च्या माध्यमातून येत असलेल्या फेसबुकच्या पेमेंट सेवेलाही यूपीआयचाच आधार आहे.