Join us

हॉलमार्किंगही असू शकतं बनावट! धनत्रयोदशीला दागिने खरेदी करत असाल तर खरं आणि खोटं ओळखा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2023 1:00 PM

सोने खरेदी करताना ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून सरकारने हॉलमार्किंग सुरू केले आहे.

सोने खरेदी करत असताना अनेकवेळा फसवणूक होते.  आपल्याला बनावट सोने देऊन फसवले जाते. अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. यामुळे सरकारने हॉलमार्किंग अनिवार्य केले. पण, तरीही फसवणुकीची प्रकरणं कमी झालेली नाहीत. काही ठिकाणी हॉलमार्किंगच बनावट असल्याची प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे सोने खरेदी करत असताना आता हॉलमार्किंगही तपासून घ्याव लागणार आहे. 

अनेक ठिकाणी सोन्याच्या दागिन्यांवर बनावट हॉलमार्किंग करत आहेत. त्यामुळे, तुम्हीही धनत्रयोदशीला दागिने खरेदी केल्यास, हॉलमार्कवर विश्वास ठेवू नका. हॉलमार्क खरा आहे की खोटा हे तपासा.

क्रेडिट कार्ड असूनही वापरत नाही, तरीही होऊ शकतं नुकसान; लगेच करा बंद

हॉलमार्किंग म्हणजे सोन्याच्या शुद्धतेची हमी देणारा मार्क. हॉलमार्क हा प्रत्येक दागिन्यावर लावलेला मार्क आहे. यामध्ये ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) चा लोगो, त्याची शुद्धता देण्यात आली आहे. यासोबतच चाचणी केंद्रांची माहितीही हॉलमार्किंगमध्ये उपलब्ध आहे. दागिन्यांमध्ये सोन्याचे प्रमाण वेगवेगळे असते, जे त्याच्या शुद्धतेवर म्हणजेच कॅरेटच्या आधारावर ठरवले जाते. अनेक वेळा ज्वेलर्स कमी कॅरेटच्या दागिन्यांसाठी जास्त कॅरेटचे दर आकारतात. ते दूर करण्यासाठी हॉलमार्किंग बंधनकारक करण्यात आले आहे.

खरेदीदार हॉलमार्किंग चिन्ह पाहूनच खरेदी करतात. खरेदीच्या वेळी दागिन्यांवर असलेला मार्क खरा की बनावट हे ओळखता येत नाही. याचा फायदा बनावट हॉलमार्किंग दागिने विकणारे व्यावसायिक घेतात. विक्रीच्या वेळी अनेकदा बनावट हॉलमार्किंग उघडकीस येतो.

सरकारने गेल्या वर्षी १ जुलैपासून सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग मार्क बदलून चिन्हांची संख्या तीन केली आहे. पहिले चिन्ह बीआयएस हॉलमार्कचे आहे. हे त्रिकोणी चिन्ह आहे. दुसरे चिन्ह शुद्धतेबद्दल सांगते. म्हणजेच किती कॅरेट सोन्याचे दागिने बनवले आहेत ते दाखवले जाते. तिसरा हा HUID क्रमांक नावाचा सहा-अंकी अल्फान्यूमेरिक कोड आहे. HUID म्हणजे हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर. या सहा अंकी कोडमध्ये अक्षरे आणि अंकांचा समावेश आहे. हॉलमार्किंगच्या वेळी, प्रत्येक दागिन्यांना एक HUID क्रमांक दिला जातो. ही संख्या अद्वितीय आहे. याचा अर्थ असा की कोणत्याही दोन दागिन्यांचा HUID क्रमांक समान असू शकत नाही.

सोने खरे आणि खोटे कसे ओळखायचे?

ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने तयार केलेल्या बीआयएस केअर अॅप नावाच्या मोबाइल अॅपद्वारे तुम्ही हॉलमार्क केलेले दागिने तपासू शकता. बीआयएस केअर अॅप डाउनलोड केल्यानंतर, तुम्हाला त्यामध्ये तुमचे नाव, फोन नंबर आणि ईमेल आयडी टाकावा लागेल. त्यानंतर, तुमचा मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी OTT द्वारे सत्यापित करणे आवश्यक आहे. पडताळणीनंतरच हे अॅप वापरता येईल. यामध्ये, व्हेरिफाय HUID विभागात जाऊन तुमचा HUID नंबर टाकून, तुम्ही दागिन्यांची गुणवत्ता, उत्पादन इत्यादींशी संबंधित सर्व माहिती मिळवू शकता.

टॅग्स :सोनंचांदी