Join us  

नऊ कॅरेट सोन्यासाठीही हॉलमार्किंग बंधनकारक?; कमी शुद्धतेच्या सोन्यालाही मागणी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 6:19 AM

२०२४ च्या लग्नसराईत सोन्याची मागणी ७५० टनांवर जाण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली - ९ कॅरेटच्या सोन्यासाठीही हॉलमार्किंग बंधनकारक करण्याचा विचार भारत सरकार करीत आहे. यासंबंधीची घोषणा लवकरच केली जाऊ शकते, असे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले. प्राप्त माहितीनुसार, कमी कॅरेटच्या सोन्याची मागणी अलीकडे वाढत चालली आहे. ९ कॅरेट, १४ कॅरेट आणि १८ कॅरेटच्या सोन्याचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे. त्यामुळे ९ कॅरेटच्या सोन्यावरही हॉलमार्किंग बंधनकारक करण्याची तयारी सरकारने चालविली आहे. याबाबत भारतीय मानक ब्युरोने सर्व संबंधित हितधारकांशी बातचीत सुरू केली आहे.

सध्या देशात २४ कॅरेट सोन्याची किंमत सुमारे ७३ हजार रुपये प्रति १० ग्रॅम आहे. २२ कॅरेटच्या सोन्याची किंमत ६६ हजार रुपये, तर ९ कॅरेटच्या सोन्याची किंमत २५ हजार रुपये ते ३० हजार रुपये प्रति १० ग्रॅम आहे. स्वस्त असल्याने ९ कॅरेट सोन्याचे मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या एका अहवालानुसार, सोन्याच्या वापराच्या बाबतीत भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. २०२४ च्या लग्नसराईत सोन्याची मागणी ७५० टनांवर जाण्याची शक्यता आहे. 

कमी कॅरेटचे सोने का आवडू लागले?सोन्याच्या किमतींमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे अधिक शुद्धतेचे सोने घेणे अनेकांना परवडेनासे झाले आहे. त्यामुळे लोक कमी शुद्धतेच्या सोन्याला पसंती देत आहेत. त्यातून ९ कॅरेटच्या सोन्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे शुद्धता तपासणीबाबतची जागरूकताही वाढत आहे.

टॅग्स :सोनं