नवी दिल्ली : आता पेट्रोल पंपावर गेल्यावर गाडीच्या टायरमध्ये हवा आणि टॉयलेट इत्यादींची सुविधा मिळते. मात्र येत्या काही दिवसांत तुम्हाला येथे आणखी सुविधा मिळतील. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले की, देशातील तेल विपणन कंपन्यांद्वारे (OMC) चालवल्या जाणार्या पेट्रोल पंपावरील सुविधा अधिक सुधारल्या जात आहेत.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने (IOCL) पंपावर खेळण्यांची दुकाने उघडण्यासाठी जागा उपलब्ध करण्यासाठी स्टार्टअपशी करार केला आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी एरोसिटी येथील इंडियन ऑइलच्या रिटेल आउटलेटमध्ये अर्बन टॉट्स टॉय किओस्कचे उद्घाटन केले. हा स्टार्टअप खेळणी बनवण्याचा आणि विकण्याच्या व्यवसायात गुंतलेला आहे. हरदीप सिंग पुरी यांनी या उपक्रमासाठी अर्बन टॉट्स चालवणाऱ्या कंपनीचे कौतुक केले.
देशभरात 500 दुकाने उघडली जातील
हरदीप सिंग पुरी म्हणाले की चंडीगड, मोहाली आणि पंचकुला येथे पहिले 5 अर्बन टॉट्स स्टोअर सुरू करण्यात आले आहेत. देशभरात अशी आणखी 500 दुकाने उघडली जातील. यावेळी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी उपस्थित मुलांशी संवाद साधला. तसेच त्यांच्या पालकांना त्यांच्या मुलांमध्ये उद्योजकतेची भावना वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिले. यादरम्यान ते म्हणाले की, यामुळे 'आत्मनिर्भर भारत'ला चालना मिळेल.