अमृता कदम नवी दिल्ली : अनेक कंपन्यांसाठी देश हा बाजारपेठ असेल, पतंजलीसाठी मात्र देश हा परिवार आहे. त्यामुळेच पतंजली कायमच पूर्ण शुद्धतेसह जागतिक दर्जाची उत्पादने देण्यासाठी आग्रही राहिली आहे. आॅनलाईन बाजारपेठेमध्ये प्रवेश करीत एका नव्या पर्वाचा शुभारंभ करतानाही पतंजलीचा हा ध्यास कायम असेल, अशी भावना योगगुरू बाबा रामदेव यांनी व्यक्त केली. ‘हरिद्वार से हर द्वार तक’ अशी टॅगलाईन घेऊन पतंजलीने ई-कॉमर्स क्षेत्रामध्ये पदार्पण केले. मंगळवारी पत्रकार परिषदेमध्ये पतंजलीच्या नव्या पर्वाची सुरुवात बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांनी केली.आपली उत्पादने ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचविण्यासाठी पेटीएम मॉल, बिग बास्केट, फ्लिपकार्ट, ग्रोफर्स, अॅमेझॉन, नेटमेडस्, शॉपक्लूज या आॅनलाईन विक्री क्षेत्रातील कंपन्यांशी पतंजलीने करार केला आहे.पतंजलीसाठी हा ऐतिहासिक दिवस असून, २५ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या आमच्या कंपनीच्या वार्षिक उलाढालीने दहा हजार कोटींचा आकडा ओलांडला आहे. भविष्यात आमचे लक्ष्य एक लाख कोटी रुपयांच्या उलाढालीचे असल्याचे बाबा रामदेव यांनी बोलून दाखविले. पतंजलीचे लक्ष नफ्यावर नसून ‘ना नफा’ तत्त्वावर चालणारी धर्मादाय कंपनी आहे, हे सांगायलाही बाबा विसरले नाहीत.परदेशी गुंतवणुकीला विरोधचएकीकडे बाबा स्वदेशीचा नारा देत परदेशी कंपन्यांना आव्हान देत आहेत, तर दुसरीकडे सरकारने सिंगल ब्रँड रिटेलमध्ये १०० टक्केपरदेशी गुंतवणुकीला मान्यता दिली आहे.बाबांची यावर भूमिका काय आहे, असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला. मी परदेशी गुंतवणुकीच्या विरोधातच आहे. मात्र, एक नवीन सुरुवात करत असताना मला कोणताही राजकीय वाद ओढवून घ्यायचा नाही, अशी सावध भूमिका रामदेव बाबांनीघेतली.पतंजलीने लोकांची मने जोडली असून, ई-कॉमर्सच्या माध्यमातून देशाला जोडण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल टाकले आहे.- आचार्य बालकृष्ण, पतंजलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी
‘हरिद्वार से हर द्वार तक’; पतंजली समूह झाला आॅनलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 2:49 AM