नवी दिल्ली: शेअर मार्केटमध्ये अनेकविध क्षेत्रातील नाना कंपन्यांचे आयपीओ येऊन धडकत आहेत. काही कंपन्या शेअर मार्केटमध्ये एन्ट्री घेताच गुतंवणूकदारांना मालामाल करत आहेत. अशा कंपन्यांचे शेअर गुंतवणुकीसाठी चांगली संधी असल्याचे सांगितले जात आहे. हैदराबाद येथील एका कंपनीने शेअर मार्केटमध्ये प्रवेश करताच कमाल कामगिरी केली आहे. पहिल्याच दिवशी या कंपनीच्या शेअरमध्ये ४४ टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले.
पाइप्स निर्मितीतील हैदराबाद स्थित कंपनी हरिओम पाइप्स इंडस्ट्रीजने (एचपीआयएल) शेअर बाजारात दमदार प्रवेश केला. कंपनीच्या शेअरची तब्बल ४४ टक्के वाढीसह २२० रुपयांवर नोंदणी झाली. कंपनीने आयपीओ योजनेसाठी प्रती शेअर १५३ रुपयांचा दर निश्चित केला होता. तोच शेअर २२० रुपयांवर गेल्याने गुंतवणूकदांची चांगली कमाई झाल्याचे सांगितले जात आहे.
आयपीओच्या माध्यामातून १३० कोटींचे भांडवल उभारले
हरिओम पाइप्स इंडस्ट्रीज लिमिटेडने आयपीओच्या माध्यामातून १३० कोटींचे भांडवल उभारले. त्याचबरोबर गुंतवणूकदारांना देखील पहिल्याच दिवशी मालामाल केले आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या मंचावर हरिओम पाइप्स इंडस्ट्रीजचा शेअर २२० रुपयांवर सूचीबद्ध झाला. आयपीओतील इश्यू प्राईसच्या तुलनेत त्याची ४४ टक्के वाढीसह नोंदणी झाली. मुंबई शेअर बाजारात या शेअरची २१४ रुपयांवर नोंदणी झाली. त्यात ४० टक्के वाढ झाली. दमदार आयपीओ नोंदणीनंतर शेअरची मागणी वाढल्याचे दिसून आले आहे. हरिओम पाइप्स इंडस्ट्रीजचा शेअर २३१ रुपयांवर गेला असून त्यात ५० टक्के वाढ झाली आहे.
दरम्यान, या कंपनीचे मुख्य कार्यालय हैदराबाद येथे असून स्थापना २००७ साली झाली. बॅकवर्ड इंटिग्रेशनवर भर देणाऱ्या कंपनीची आपल्या स्टील उत्पादनांवर भक्कम पकड आहे आणि भारतात, विशेषतः दक्षिण व पश्चिम भारतात त्यांचे विस्तृत वितरण जाळे आहे. तिसऱ्या पिढीच्या उद्योजकांतर्फे नेतृत्व केल्या जाणाऱ्या या कंपनीचा वैविध्यपूर्ण पोर्टफोलियो आहे. आर्थिक वर्ष २०२१ साठी कंपनीचे एकूण उत्पन्न २५४.८२ कोटी रुपये होते तर त्या आधीच्या वर्षी १६१.१५ कोटी इतके उत्पन्न होते. कंपनीला १५.१३ कोटींचा निव्वळ नफा झाला होता तर त्या आधीच्या वर्षी तो ७.९० कोटी इतका होता.