नवी दिल्ली : जगप्रसिद्ध हर्ले-डेव्हिडसन मोटारसायकली भारतात स्वस्त होणार असल्याचे वृत्त आहे. या मोटारसायकलींवर सध्या ५० टक्के आयात कर लागतो. त्यात कपात करण्याचा एक प्रस्ताव अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापारी चर्चेत आहे. यावर आधी १०० टक्के कर होता.
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जाहीर नाराजीनंतर मोदी सरकारने तो ५० टक्के केला होता. आता त्यात आणखी कपात होणार आहे.
जगप्रसिद्ध हर्ले-डेव्हिडसन मोटारसायकलींच्या आयातीवर भारत सरकारने लावलेल्या करावर अमेरिकी राष्टÑाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टीका केली होती. भारतीय मोटारसायकलींच्या आयातीवरही अमेरिकेत कर लावण्याचा इशारा दिला होता. भारत सरकारने महागड्या मोटारसायकलींच्या आयातीवरील कर ७५ टक्क्यांवरून कमी करून ५० टक्के केला आहे. ट्रम्प यांचे त्याने समाधान झालेले नाही. काँग्रेस सदस्यांशी स्टील उद्योगासंदर्भात झालेल्या चर्चेत ट्रम्प यांनी सांगितले की, भारत सरकारने महागड्या मोटारसायकलवरील कर ७५ टक्क्यांवरून ५० टक्के केला असला, तरी ते पुरेसे नाही. अमेरिकेत आयात मोटारसायकलींवर शून्य कर आहे. असेच धोरण भारत सरकारने ठेवले पाहिजे.
ट्रम्प म्हणाले होते की, अनेक देशांबाबत असे आहे की, आम्ही एखादे उत्पादन बनवितो, तेही उत्पादन बनवितात, आमचे उत्पादन त्यांच्या देशात पाठविण्यासाठी आम्ही प्रचंड कर भरतो, त्यांना मात्र काहीच द्यावे लागत नाही. पंतप्रधान मोदी यांच्यासोबतच्या संभाषणाचा उल्लेख करून ट्रम्प म्हणाले की, मला सांगितले की, आम्ही मोटारसायकलींवरील कर ७५ टक्क्यांवरून कमी करून ५० टक्के केला आहे. आम्ही कर १०० टक्क्यांवरून खाली आणला आहे. ट्रम्प म्हणाले होते की, तुम्ही हर्ले-डेव्हिडसनवर ५० ते ७५ टक्के कर लावणार असाल, तर तुमच्या उत्पादनांवर लावायला आमच्याकडेही कर आहेत.