मुंबई - आपल्या देशाबद्दल, राज्याबद्दल, गावाबद्दल आणि गावच्या मातीबद्दल सर्वांनाच अभिमान असतो. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी, असे म्हणत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जननी जन्मभूमीच स्वर्गाहून सुंदर असल्याचं म्हटलं. त्यामुळेच, प्रत्येकाला आपल्या गावाच, राज्याचा अभिमान असतो. मात्र, सोशल मीडियावर कायम सक्रीय असलेल्या उद्योगपती हर्ष गोएंकांनी केलेल्या गुजराती ट्विटवरुन त्यांना चांगलच ट्रोल करण्यात येत आहे.
उद्योजक हर्ष गोएंका आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सक्रीय असतात. आपले मत मांडताना अनेकदा उद्योग व्यवसायातील माहितीही ते शेअर करत असतात. कधी-कधी गमतीदार व्हिडिओ आणि विनोदही ते शेअर करतात. मात्र, नुकतेच त्यांनी एक ट्विट केले आहे. त्या, ट्विटमध्ये गुजराती लोकांच्या यशाबद्दलची माहिती त्यांनी दिलीय. तसेच, भई, गुजराती मिट्टी मे कुछ खास है... असेही म्हटले आहे.
गोएंका यांच्या ट्विटरला अनेकांनी रिप्लाय दिला असून लोकांना महागाईला जबाबदार कौन?, देश कौन बेच रहा है? अशा प्रश्नांची सरबत्तीच केली आहे. तसेच, देशाचा पैसा घेऊन कोण पळून गेले? असे म्हणत नीरव मोदी, ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांची नावेही काहींनी शेअर केली आहेत. तर, आपल्यासारख्या उद्योजकांनी असे मत व्यक्त करणे चुकीचे आहे, असा सल्लाही काहींनी दिला आहे.