Tatkal Ticket Booking Time : पुढील काही दिवसात तुम्ही ट्रेनने प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. रेल्वे प्रवासासाठी आगाऊ तिकीट बुकिंग केलं नसेल तर प्रत्येकजण तत्काळ तिकिट बुकिंगचा पर्याय वापरतात. पण, सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. यात भारतीय रेल्वेने तत्काळ तिकिट बुकिंगची वेळ बदलली असल्याचा दावा केला जात आहे. काय आहे या व्हायरल पोस्ट सत्य? या पोस्टवर खुद्द भारतीय रेल्वेने स्पष्टीकरण दिलं आहे.
काय प्रकरण आहे?
व्हॉट्सअॅप, फेसबुक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की रेल्वेच्या तात्काळ तिकिट बुकिंगची वेळ १५ एप्रिलपासून बदलत आहे. प्रीमियम तात्काळ तिकिटांच्या वेळेतही बदल झाल्याचा दावा करण्यात आला आहे. लोक ते खरे आहे असे समजून एकमेकांना फॉरवर्ड करत आहेत. कदाचित तुमच्या निदर्शनात अशी पोस्ट आली असावी. ही फॉरवर्ड करण्याआधी सत्य जाणून घेणे आवश्यक आहे.
सत्य काय आहे?
आयआरसीटीसीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन या पोस्टचे खंडन केलं आहे. सोशल मीडियावर फिरणारी ही पोस्ट खोटी असल्याचे सांगितले. आयआरसीटीसीने म्हटले आहे की सोशल मीडिया चॅनेलवर अशा काही पोस्ट फिरत आहेत, ज्यामध्ये तत्काळ आणि प्रीमियम तत्काळच्या वेगवेगळ्या वेळेचा उल्लेख केला जात आहे. आयआरसीटीसीच्या मते, एसी आणि नॉन-एसी क्लासेसमध्ये तत्काळ किंवा प्रीमियम तत्काळसाठी बुकिंग वेळेत बदल करण्याचा सध्या कोणताही प्रस्ताव नाही. एजंट्सच्या वेळेतही कोणताही बदल झालेला नाही.
Some posts are circulating on Social Media channels mentioning about different timings for Tatkal and Premium Tatkal tickets.
— IRCTC (@IRCTCofficial) April 11, 2025
No such change in timings is currently proposed in the Tatkal or Premium Tatkal booking timings for AC or Non-AC classes.
The permitted booking… pic.twitter.com/bTsgpMVFEZ
तात्काळ तिकीट बुकिंग किती वाजता होईल?
ट्रेनच्या सर्व एसी क्लासेस (२एसी, ३एसी, सीसी, ईसी) साठी तत्काळ बुकिंग प्रवासाच्या १ दिवस आधी सकाळी १० वाजता सुरू होते. तर, स्लीपर क्लास (SL) साठी बुकिंग प्रवासाच्या एक दिवस आधी सकाळी ११ वाजता सुरू होते. उदाहरणार्थ, जर तुमची ट्रेन २० तारखेला असेल, तर तत्काळ बुकिंग १९ तारखेला केले जाईल. कृपया लक्षात घ्या की फर्स्ट क्लासमध्ये त्वरित बुकिंगची सुविधा नाही. प्रीमियम तत्काळसाठीही तिकिट बुकिंग वेळ समान आहे.