गेल्या तीन दिवसांपासून इरेडाचे (IREDA) शेअर्सना पाच पाच टक्क्यांचं लोअर सर्किट लागत आहे. यापूर्वी कंपनीच्या शेअर्सनं 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर गाठला होता. आता शेअर्समध्ये सातत्याने होत असलेली घसरण पाहता हा शेअर खरेदी करायला कोणी तयार नाही. 2 कोटींहून अधिक शेअर्स विक्रीच्या ऑर्डरवर आहेत. शुक्रवारी इरेडाचे शेअर्स 5 टक्के लोअर सर्किटसह 179.60 रुपयांवर होते. गेल्या तीन दिवसांत त्याचे शेअर्स सुमारे 13 टक्क्यांनी घसरले आहेत.
IREDA च्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 214.80 रुपये प्रति शेअर आहे, तर 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 50 रुपये प्रति शेअर आहे. दरम्यान, कंपनीनं गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आयपीओ आणला होता आणि 29 नोव्हेंबर रोजी तिचे शेअर्स 60 रुपये प्रति शेअर या दरानं शेअर बाजारात लिस्ट झाले होते. कंपनीच्या आयपीओची प्राईज 30 ते 32 रुपये प्रति शेअर होती.
दोन महिन्यांत तिप्पट नफा
शेअर बाजारात लिस्ट झाल्यानंतर, IREDA च्या शेअर्सनं (IREDA Share Price) दोन महिन्यांत तिप्पट परतावा दिला. 60 रुपयांपासून हा शेअर दोन महिन्यांत 214 रुपयांपर्यंत पोहोचला. या कालावधीत सुमारे 250 टक्क्यांचा परतावा दिला. तर या शेअरनं एका महिन्यात 70 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. मात्र, पाच दिवसांत त्यात 12 टक्क्यांपेक्षा अधिक घसरण दिसून आली. IREDA वर इक्विटी रेश्यो 35.67 टक्के आहे.
खरेदीदारच नाहीत
गेल्या तीन दिवसांपासून IREDA च्या शेअर्समध्ये सातत्यानं घसरण सुरू आहे. त्यानंतर गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात शेअर्स विकत आहेत, पण त्यांना खरेदीदारच सापडत नसल्याचं समोर आलंय. सुमारे 2 कोटी शेअर्स विक्रीसाठी प्रलंबित आहेत.
तुम्हीही अडकलात का?
जर तुम्हीही इरेडाचे शेअर्स 200 रुपयांना विकत घेतले असतील तर आतापर्यंत तुमचं खूप मोठं नुकसान झालं असेल. इरेडाच्या शेअर्सचं लोअर सर्किट केव्हा जाणार याबाबत अद्यापही स्पष्टता नाही.
(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)