जर तुम्ही युट्यूब किंवा अन्य कोणत्याही सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर्सच्या सल्लानुसार शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. बाजार नियामक सेबीनं (SEBI) यूट्यूबर रवींद्र भारती आणि त्यांची कंपनी रवींद्र भारती एज्युकेशनल इन्स्टिट्यूटवर ४ एप्रिल २०२५ पर्यंत सिक्युरिटीज मार्केटमधून बंदी घातली आहे. यासोबतच सेबीनं बेकायदेशील व्यवहारांसाठी फिनफ्ल्युएन्सर आणि फर्मला ९.५ कोटी रुपयांचं बेकायदेशीर उत्पन्न परत करण्याचे आदेश दिले आहेत. शुभांगी रवींद्र भारती, राहुल अनंत गोसावी आणि धनश्री चंद्रकांत गिरी यांना ४ एप्रिलपर्यंत सिक्युरिटीज मार्केटमध्ये व्यवहार करण्यास किंवा त्यात एन्ट्री घेण्यास बंदी घालण्यात आली आहे.
संस्थेनं केली ही चूक
सेबीने नमूद केलं की, रवींद्र भारती एज्युकेशन इन्स्टिट्यूटनं आपल्या कॅम्पस आणि कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून अनुभव नसलेल्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाटी नॉन रजिस्टर गुंतवणूकीचा सल्ला, शिफारशी आणि अंमलबजावणीचा वापर केला. याशिवाय दोन युट्युब चॅनल चालवणारे फायनान्शिअल इन्फ्लुएन्सर रवींद्र भारती यांच्या पतपात्रतेच्या आधारे हाय रिटर्नचं मार्केटिंग केलं. तसंच एका ग्राहकाला अनेक प्लॅन्स विकले जातात आणि ट्रेडिंग निर्णयांमध्ये ग्राहकांचा मर्यादित सहभाग असतो, असंही त्यात नमूद केलं.
व्याजासह पैसे परत करा
नियामकानं म्हटलं आहे की करारातील जोखीम किंवा अपूर्ण वित्तीय खुलाशांबाबत क्लायंटला पूर्णपणे माहिती दिली गेली नाही. त्यानुसार सेबीनं रवींद्र भारती आणि त्यांची कंपनी रवींद्र भारती एज्युकेशन इन्स्टिट्यूट यांना संयुक्त आणि काही कारणांमुळे ६ टक्के व्याजानुार ९.४९ कोटी रुपयांची रक्कम परत करण्याचे आदेश दिलेत. तसंच पाचही संस्थांना सिक्युरिटीज मार्केटमध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली असून ४ एप्रिल २०२५ पर्यंत सिक्युरिटीजशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या खरेदी, विक्री किंवा व्यवहार करण्यास किंवा सिक्युरिटीज मार्केटशी कोणत्याही प्रकारे जोडले जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
सल्लागार म्हणून काम बंद करावं
रवींद्र भारती एज्युकेशन इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड किंवा रवींद्र भारती वेल्थ या नावांसह गुंतवणूक सल्लागार सेवा पुरविणं किंवा गुंतवणूक सल्लागार म्हणून काम करणं थांबवावं लागेल, असं सेबीनं आपल्या आदेशात म्हटलंय. सेबीने पाच संस्थांना १० लाख रुपये आणि रवींद्र भारती एज्युकेशन इन्स्टिट्यूट, राहुल अनंत गोसावी आणि धनश्री चंद्रकांत गिरी यांना ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.