Join us

स्मॉल, मीडियम, लार्ज कॅप ऐकलंय?, माहितीये कॅपिटल गेन वर किती टॅक्स लागतो?, वाचा सर्व प्रश्नांची उत्तरं 

By पुष्कर कुलकर्णी | Published: January 08, 2022 5:54 PM

Share Market : मागील भागात आपण टेक्निकल अनॅलिसिस बाबत जाणून घेतले. या भागात आपण मार्केट कॅप आणि कॅपिटल गेन टॅक्स  बाबत जाणून घेऊ.

डॉ. पुष्कर कुलकर्णी आपण बऱ्याच वेळा ऐकतो अमुक कंपनी लार्ज कॅपमध्ये, मिडीयम कॅप किंवा स्मॉल कॅपमध्ये आहे. हे नेमके कसे ठरवितात? उत्तर जाणून घेऊ अगदी सोप्या भाषेत. कॅप ठरविताना कंपनीचे एकूण बाजार भांडवल किती यावर ती कोणत्या कॅपमध्ये आहे ते ठरविले जाते. 

बाजार भांडवल (Market Cap) कसे ठरवितात ?कंपनीचे एकूण बाजारातील एकूण शेअर्स (outstanding shares) आणि कंपनीचा शेअरचा वर्तमान बाजारभाव यांचा गुणाकार म्हणजेच मार्केट कॅप. उदा. एखाद्या कंपनीच्या  एकूण शेअर्सची संख्या १० कोटी आहे आणि वर्तमान शेअरचा भाव ५५० रुपये आहे, तर त्या कंपनीचे एकूण मार्केट कॅप १० कोटी x ५५० म्हणजेच एकूण रुपये ५,५०० कोटी रुपये आहे. 

कंपन्यांची विभागवारी तीन प्रकारांत केली जाते 

लार्ज कॅप - ज्या कंपनीचे एकूण मार्केट कॅप २० हजार कोटी किंवा त्याहूनही अधिक आहे अशी कंपनी लार्ज कॅप मध्ये असते. 

मीडियम कॅप - ज्या कंपनीचे एकूण मार्केट कॅप ५ हजार ते २० हजार या मध्ये आहे अशी कंपनी मीडियम कॅप मध्ये असते. 

स्मॉल कॅप - ज्या कंपनीचे एकूण मार्केट कॅप ५ हजार कोटी किंवा त्याहूनही कमी आहे अशी कंपनी स्मॉल कॅप मध्ये असते. 

कॅपिटल गेन आणि त्यावरील टॅक्स नफा आणि तोटा हे बाजाराचे अविभाज्य अंग आहेत. बाजारात व्यवहार करताना जसा फायदा मिळतो आणि आपण आनंदी होतो, तसा तोटा सहन करण्याची हिम्मत सुद्धा दाखविता आली पाहिजे. बाजारातून नफा आणि तोटा याचा आपल्या इन्कम टॅक्सशी काही संबंध आहे का? याचे उत्तर होय असे आहे. 

कॅपिटल गेन वर टॅक्स किती ? शॉर्ट टर्म आणि लॉन्ग टर्म असे दोन प्रकारचे कॅपिटल गेन टॅक्स आहेत.  शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा एक वर्षाच्या आतील कमाविलेल्या नफ्यावर आकारला जातो. इंट्रा डे किव्वा डिलिव्हरी बेस ट्रेड मधून जर एक दिवस ते एक वर्ष या कालावधीत जो एकूण नक्त नफा मिळविला (एकूण फायदा - एकूण तोटा = एकूण नक्त नफा) त्यावर १५% टॅक्स दर + ४% सेस आकारला जातो. कॅपिटल गेन टॅक्स हा स्वतंत्र विषय असून त्याचा इतर टॅक्स (पगार + इतर व्यवसाय) यांचेशी संबंध नाही. जर आपले उत्पन्न एकूण टॅक्स मर्यादेच्या खाली असेल तर शेअर विक्रीतुन मिळविलेला फायदा यातून वळता करता येतो. 

लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा एक वर्षाच्या वरील विक्रीतून मिळविलेला फायदा असतो. म्हणजे  शेअर्स १ एप्रिल २०२० ला खरेदी केले असतील आणि ते जर २ एप्रिल २०२१ ला विकले तर त्याचा अर्थ ते एका वर्षानंतर विकले असा होतो. त्या व्यवहारातून मिळविलेला फायदा हे लॉन्ग टर्म गेन म्हणून ग्राह्य धरला जातो. अशा नफ्यावर १० टक्के (अधिक सेस) या दराने टॅक्स आकारला जातो. 

नुकसान झाले तर काय? जर शेअर व्यवहारातून नुकसान झाले तर त्या संदर्भात इन्कम टॅक्स कायद्यात अनेक तरतुदी आहेत. एका आर्थिक वर्षाचा एकूण लॉस पुढील ८ वर्षे कॅरी फॉरवर्ड करता येतो. म्हणजेच पुढील वर्षी जर फायदा झाला तर मागील वर्षीचा तोटा त्यातून वजा करता येतो. असा वजा केला तोटा जर फायदा पेक्षा जास्त असेल तर उर्वरित तोटा पुढील आर्थिक वर्षात कॅरी फॉरवर्ड करता येतो. परंतु या संदर्भात आपल्या टॅक्स कन्सल्टन्टकडून अधिक माहिती घेणे उचित ठरेल. 

पुढील भागात काही महत्त्वाच्या टिप्स खास आपल्यासाठी ...  (क्रमशः)

हेही वाचा 

टेक्निकल ॲनालिसिस... 'ट्रेडिंग'मधून पैसे कमावण्याचं भारी 'टेक्निक', समजून घ्या 'चार्ट की बात'म्युच्युअल फंडात पैसे गुंतवावे का, थेट शेअर बाजारात उतरावे?शेअर बाजारात ट्रेडिंग करताय... सपोर्ट आणि रेझिस्टन्स लेव्हल म्हणजे काय माहितीये?

टॅग्स :शेअर बाजार