विमाधारकाचा मृत्यू झाल्यानंतर जीवन विमा कंपनी पॉलिसी दस्तातील नामांकन (नॉमिनेशन) असलेल्या व्यक्तीस विम्याच्या लाभाची रक्कम अदा करते. एकापेक्षा अधिक व्यक्तींना नामांकन देण्याची सुविधाही विमा कंपन्या देतात. जेव्हा कंपनी विम्याची रक्कम नामनिर्देशित व्यक्तीस देते, तेव्हा त्यास दाव्याचा निपटारा (क्लेम सेटलमेंट) म्हणतात. दावा निपटारा ३० दिवसांच्या आत करणे कंपन्यांसाठी आवश्यक असते. अपघाती मृत्यूप्रकरणी कंपनी पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आणि एफआयआरची प्रत मागू शकते.
असा करा मृत्यू दावा
विमाधारकाचा मृत्यू झाल्यास वारसदारांनी सर्वप्रथम जीवन विमा कंपनीस त्याची माहिती द्यायला हवी. त्यासाठीचा इंटिमेशन फॉर्म भरून देणे आवश्यक असते. यात विमाधारकाचे नाव, पॉलिसी क्रमांक, मृत्यूचे कारण, मृत्यूची तारीख, मृत्यूचे स्थान, दावा दाखल करणाराचे नाव यासारखी माहिती भरावी लागते. विमा कंपनीच्या वेबसाईटवरून हा फॉर्म मिळविला जाऊ शकतो.
आवश्यक दस्तावेज
विमाधारकाचे मृत्यू प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. विमा कंपनीला आणखी दस्तावेजांची गरज भासल्यास तेही देणे आवश्यक असते. पॉलिसी घेतल्यानंतर ३ वर्षांच्या आत मृत्यू झाल्यास कंपनी स्वतंत्रपणे चौकशी करून सत्यता जाणून घेऊ शकते. पॉलिसीसोबत गंभीर आजार, अपघात आणि हप्त्यातील सवलत यासारखे रायडर्स घेतले असल्यास त्याच्या दाव्याची प्रक्रिया वेगवेगळी असते. अशा प्रकरणांत कंपनी एफआयआरची प्रत आणि रुग्णालयाचा अहवाल मागू शकते.
जिवंत राहिल्यासंबंधीचा दावा
पॉलिसीचा पक्वता (मॅच्युरिटी) कालावधी पूर्ण झाल्यानंतर विमा पॉलिसी धारक जिवंत असल्यास कंपनी पॉलिसीधारकास पक्वतेसंबंधी पूर्व सूचना देते. विमा कंपनी पॉलिसीधारकास पॉलिसी डिस्चार्ज अर्ज पाठवते. पॉलिसीधारकाने पॉलिसी दस्तावेज, ओळखपत्राचा वैध पुरावा, बँक पासबुकची प्रत अथवा कॅन्सल चेक देणे आवश्यक असते.
विमा घेणे का महत्त्वाचे?
गुंतवणुकीची सुरक्षितता, महागड्या उपचारांपासून दिलासा, रुग्णालयाशिवाय इतर खर्चापासून सुटका, मेडिकल चेकअपही विम्यामध्ये कव्हर होतो. विम्यामुळे तुमच्या कुटुंबाला मदतीचा मोठा आधार बनतो.