HDFC Merger: एचडीएफसी बँक ही खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक आहे. एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी लिमिटेड यांच्या विलिनीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे. या विलिनीकरणासंदर्भात काही सवलती देण्याची मागणी एचडीएफसीकडून रिझर्व्ह बँकेला करण्यात आली होती. मात्र, रिझर्व्ह बँकेने सवलती देण्यास नकार दिला आहे. देशाच्या उद्योग क्षेत्रातील आजवरचे सर्वांत मोठे विलीनीकरण ठरणार असल्याचे म्हटले जात आहे.
एचडीएफसी बँकेने शेअर मार्केटला यासंदर्भातील माहिती दिली आहे. एचडीएफसी बँकेमधील एचडीएफसी लिमिटेडच्या विलीनीकरणाआधी रिझर्व्ह बँकेने एचडीएफसी बँकेला सीआरआर आणि एसएलआर याबाबत सवलत देण्यास नकार दिला आहे. असे असले तरी प्राधान्य क्षेत्र कर्जपुरवठ्यात मात्र काही सवलती रिझर्व्ह बँकेने एचडीएफसी बँकेला दिल्याचे सांगितले जात आहे.
एचडीएफसी बँकेने काय मागण्या केल्या होत्या?
सीआरआर म्हणजे वाणिज्य बँकांना ठरावीक प्रमाणात ठेवी रिझर्व्ह बँकेकडे ठेवाव्या लागतात. त्यावर रिझर्व्ह बँकेकडून कोणतेही व्याज मिळत नाही. एसएलआर म्हणजे बँकांना केंद्र सरकारच्या व अन्य मान्यताप्राप्त रोख्यांमध्ये गुंतवणूक करावी लागते. ही सक्तीची गुंतवणूक आहे. बँकेतर वित्तीय संस्थांना यातून सूट देण्यात एका अर्थाने आली आहे. एचडीएफसी बँकेनेदेखील याबाबत सवलतीची मागणी केली होती.
देशाच्या इतिहासातील सर्वांत मोठे विलीनीकरण ठरणार
एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी यांनी ४० अब्ज डॉलरच्या विलिनीकरणाची घोषणा मागील वर्षी एप्रिल महिन्यात केली. देशाच्या इतिहासातील हे सर्वांत मोठे विलीनीकरण ठरणार आहे. हे विलिनीकरण आता अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. नियामकाकडून काही नियामक आवश्यकतांच्या पूर्ततेबाबत काही सवलती एचडीएफसी बँकेने रिझर्व्ह बँकेकडे मागितल्या होत्या. याबाबत रिझर्व्ह बँकेचे पत्र एचडीएफसी बँकेला प्राप्त झाले आहे. अद्याप काही मुद्द्यांवर रिझर्व्ह बँकेकडून स्पष्टता येणे बाकी आहे. विलिनीकरणाच्या तारखेपासून एचडीएफसी बँकेला सीआरआर, एसएलआर आणि एलसीआर याबाबत असलेल्या रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे पालन करावे लागेल आणि त्यातून कोणतीही सवलत मिळणार नाही, असे रिझर्व्ह बँकेने पत्रात स्पष्ट केले आहे.
दरम्यान, एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक यांचे विलिनीकरण विद्यमान आर्थिक वर्षात जुलैपर्यंत होण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेकडून अद्याप काही बाबींचे स्पष्टीकरण आलेले नसल्याने विलीनीकरणाच्या प्रक्रियेस विलंब होत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"