Join us

HDFC बँकेने ग्राहकांना केलं अलर्ट; फेक मेसेज आणि कॉलपासून राहा सावध अन्यथा बसेल मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 11:59 AM

HDFC Bank : बँकेने आपल्या ग्राहकांना काही सूचना दिल्या आहेत. ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे.

नवी दिल्ली - ऑनलाईन फसवणुकीच्या (Online Fraud) अनेक घटना सध्या सातत्याने समोर येत आहेत. याच दरम्यान HDFC बँकेने आपल्या ग्राहकांना अलर्ट केलं आहे. बँकेने आपल्या ग्राहकांना काही सूचना दिल्या आहेत. ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. ज्यामध्ये पॅन कार्ड डिटेल्स अपडेट करण्यासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यास मनाई करण्यात आली आहे. आजकाल पॅन कार्ड नंबर अपडेट करण्याच्या नावावर अनेक बनावट एसएमएस येत आहेत असं म्हटलं आहे.

पॅनकार्ड अपडेट करण्याच्या नावाने लोकांना अनेक खोटे मेसेज पाठवले जात आहेत. अनेक जण या जाळ्यात अडकले असून त्यांचं मोठं नुकसान झालं आहे. एचडीएफसी बँकेने ग्राहकांनी नेहमी लक्षात ठेवावे की बँक एसएमएस किंवा कॉलद्वारे गोपनीय माहिती शेअर करण्यास कधीही विचारणार नाही. मात्र, केवळ एचडीएफसी बँकच नाही तर कोणतीही बँक आणि वित्तीय संस्था कधीही त्यांच्या ग्राहकांना वैयक्तिक खात्याचे तपशील शेअर करण्यास सांगत नाही असं म्हटलं आहे. 

बँका नेहमीच अधिकृत वेबसाईटवर उपस्थित असलेल्या अधिकृत क्रमांकाद्वारे एसएमएस पाठवून तसे करतात. ग्राहकांनी हे क्रमांक नेहमी लक्षात ठेवावे. एचडीएफसी बँकेच्या बाबतीत, ग्राहकांना अधिकृत क्रमांक 186161 किंवा HDFCBK/HDFCBN या आयडीवरून एसएमएस येईल. तसेच SMS मध्ये उपस्थित असलेल्या लिंक नेहमी अधिकृत डोमेन hdfcbk.io वरून येतील. कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. 

कोणत्याही अनोळखी नंबरवरून कॉल आला तर सतर्क राहा. तुम्हाला असे खोटे एसएमएस किंवा कॉल आल्यास, त्याची तात्काळ बँकेला तक्रार करा किंवा सायबर फसवणुकीबाबत तुमच्या तक्रारीसाठी तुम्ही नॅशनल क्राइम रिपोर्टिंग पोर्टलला भेट देऊ शकता. आरबीआयने अशा बनावट एसएमएस आणि कॉल्सची ओळख पटवण्यासाठी एक बुकलेट जारी केलं आहे. Be Aware and Beware असं त्याचं नाव आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :एचडीएफसी