मुंबई - पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी बँक) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्बंध लादले असून बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. पीएमसी बँक डबघाईला आल्याने रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे. यामुळे ग्राहक चिंतीत झाले आहेत. त्यानंतर आता इतरही अनेक बँकांबाबत अफवा व्हायरल होत आहे. अशातच एचडीएफसी बँकेच्या पासबुकचा एक फोटो काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला आहे. बँकेच्या पासबुकवर असलेल्या DICGC च्या स्टॅम्पची चर्चा रंगली आहे.
एचडीएफसीने व्हायरल होणाऱ्या बँकेच्या पासबुकवरील DICGC चा स्टॅम्पबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. रिझर्व्ह बँकने 22 जुलै 2017 रोजी एक परिपत्रक काढले होते. त्याचे पालन सर्वच बँका करत आहेत. त्यामुळे हे नवीन परिपत्रक नसून DICGC चे नियम सर्वच बँकांना लागू होत असल्याची माहिती बँकेच्यावतीने देण्यात आली.
व्हायरल होत असलेल्या फोटोतील पासबुकवर असलेल्या स्टॅम्पमध्ये बँकेमध्ये जमा केलेले पैसे हे DICGC च्या विम्यानुसार आहेत. जर, बँक दिवाळखोरीत निघाली तर DICGC ही ग्राहकांना पैसे देण्यासाठी कटिबद्ध आहे. ग्राहकांनी दावा केल्यानंतरच्या दोन महिन्यात त्यांना फक्त एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळणार आहे. रिझर्व्ह बँकेने DICGC च्या विम्याबाबतची माहिती पासबुकवरील पहिल्या पानावर देण्याचे निर्देश दिले आहेत. व्यावसायिक बँका, छोट्या पतपुरवठादार बँका आणि पेमेंट बँकांना हे निर्देश देण्यात आल्याची माहिती एचडीएफसी बँकेने म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी 9 बँका बंद होणार असं वृत्त व्हायरल झालं होतं. मात्र त्यानंतर रिझर्व्ह बँकेनेच याबाबत माहिती दिली. बँक ऑफ महाराष्ट्र, देना बँक, सेंट्रल बँक, युनायटेड बँक, कॉर्पोरेशन बँक, युको बँक, आयडीबीआय, आंध्र बँक व इंडियन ओव्हरसीज बँक बंद करण्याचे वृत्त सर्वत्र पसरल्यामुळे खातेदारांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थ सचिव राजीव कुमार यांनी काही बँका बंद करण्यात येणार असल्याचे वृत्त खोडसाळ असल्याचे म्हटले होते. काही सरकारी बँका बंद करणार असल्याच्या वृत्तामध्येही अजिबात तथ्य नाही. किंबहुना सरकारी बँका अधिक भक्कम करण्यात येणार असून, त्यामुळे त्या आपल्या खातेदारांना अधिक चांगली सेवा देऊ शकतील, असेही राजीव कुमार यांनी स्पष्ट केले होते.