Join us  

HDFC बँकेच्या नफ्यात २०% वाढ, प्रत्येक शेअरधारकाच्या खात्यात एवढे पैसे होणार जमा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 3:12 PM

देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या HDFC बँक लिमिटेडने जानेवारी-मार्च तिमाहीत मोठा नफा कमावला आहे.

देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या HDFC बँक लिमिटेडने जानेवारी-मार्च तिमाहीत मोठा नफा कमावला आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या चौथ्या तिमाहीत बँकेचा नफा वार्षिक आधारावर २०.६० टक्क्यांनी वाढून १२,५९४.४७ कोटी रुपये झाला आहे. तर बँकेचे उत्पन्न ३१ टक्क्यांनी वाढून ५३,८५१ कोटी रुपये झाले आहे.

Cryptocurrency Market: “यावर त्वरित लक्ष..,” क्रिप्टोकरन्सीबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा मोठा इशारा

शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत बँकेने म्हटले आहे की, आर्थिक वर्ष २०२१-२२ जानेवारी-मार्च तिमाहीत तिचा निव्वळ नफा १०,४४३.०१ कोटी रुपये होता. आणि त्याचे एकूण उत्पन्न ४१,०८६ कोटी रुपये आहे. यासोबतच बँकेने संपूर्ण आर्थिक वर्ष २०२२-२३ चे निकालही जाहीर केले आहेत.

मागील आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये बँकेचा निव्वळ नफा ४५,९९७.११ कोटी रुपये आहे. मागील आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ते ३८,०५२.७५ कोटी रुपये होते. जानेवारी-मार्चमध्ये स्टँडअलोन आधारावर बँकेचा निव्वळ नफा १२,०४७.४५ कोटी होता. उर्वरित नफा बँकेने इतर स्त्रोतांमधून मिळवला आहे.

बँकेने आपली कमाई आपल्या भागधारकांसोबत शेअर करण्याची घोषणाही केली आहे. एचडीएफसी बँकेने त्यांच्या प्रत्येक शेअरवर १९ रुपये लाभांश देण्याचे सांगितले आहे. म्हणजेच प्रत्येक शेअरधारकाच्या खात्यात प्रत्येक शेअरवर लाभांश म्हणून १९ रुपये जमा होतील.

एचडीएफसी बँकेच्या आर्थिक विवरणानुसार बँकेच्या कर्जावरील तोटा कमी झाला आहे. बँकेची कर्ज तोटा तरतूद २,६८५.३७ कोटी रुपये होती. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत ते ३,३१२.३५ कोटी रुपये होते.

बँकेने माहिती दिली आहे की या कालावधीत त्यांचे एकूण NPA एकूण कर्जाच्या १.१२ टक्के आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत तो १.१७ टक्के होता. डिसेंबर २०२२ ला संपलेल्या तिमाहीत तो १.२३ टक्के होता.

टॅग्स :एचडीएफसी