खासगी क्षेत्रातील मोठी बँक HDFC बँकेला पुन्हा एकदा तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. मंगळवारी HDFC बँकेचं अॅप डाऊन झाल्याची तक्रार समोर आली होती. त्यानंतर बँकेनं आपल्या ग्राहकांना नेट बँकिंगच्या पर्यायाचा वापर करण्याचा सल्ला दिला होता. तसंच याद्वारे आपली कामं पूर्ण करण्यास सांगितलं होतं. परंतु आता ही तांत्रिक समस्या दूर करण्यात आल्याचं बँकेकडून सांगण्यात आलं आहे.
"मोबाईल बँकिंग अॅपमध्ये येणारी समस्या सोडवण्यात आली आहे. ग्राहकांना आता नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग अॅपचा वापर करता येणार आहे. ग्राहकांना झालेल्या गैरसोयीबद्दल क्षमस्व," असं एचडीएफसी बँकेनं ट्वीट करत माहिती दिली आहे.
काय म्हटलं बँकेनं?
"मोबाईल बँकिंग अॅपवर काही समस्या जाणवत आहे. प्राधान्यानं आम्ही ही समस्या सोडवण्याचं काम करत आहोत. लवकच आम्ही यासंदर्भात माहिती देऊ. ग्राहकांना आपल्या ट्रान्झॅक्शन्ससाठी नेट बँकिंगचा वापर करावा. असुविधेसाठी आम्हाला खेद आहे," असं बँकेचे प्रवक्ते राजीव बॅनर्जी म्हणाले होते.
यापूर्वीही काही वेळा HDFC बँकेला तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागला होता. २०१९ च्या डिसेंबर महिन्यात एकदा बँकेची नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग सुविधा अनेक तासांसाठी ठप्प झाली होती. त्यामुळे ग्राहकांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागला होता.