Join us

Iphone खरेदी करताना आता 'ही' बँक डिस्काऊंट देणार नाही, पार्टनरशिप तुटली; काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2024 3:57 PM

तुम्हीही Apple चे प्रोडक्ट किंवा आयफोन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आता अॅपलचे प्रोडक्ट खरेदी केल्यास या बँकेच्या ऑफर्स मिळणार नाहीत.

तुम्हीही Apple चे प्रोडक्ट किंवा आयफोन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आता अ‍ॅपलचे प्रोडक्ट खरेदी केल्यास एचडीएफसी बँकेच्या ऑफर्स मिळणार नाहीत. देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसीनं आयफोन निर्माता अ‍ॅपलसोबतची भागीदारी ५ वर्षांनंतर संपुष्टात आणली आहे. यामुळे ग्राहकांना यापुढे आयफोन व्यतिरिक्त अ‍ॅपलच्या उत्पादनावर ऑफर्स किंवा कोणतीही सूट मिळणार नाही.

जे एचडीएफसी बँकेचे ग्राहक आहेत आणि सणासुदीच्या काळात सेलची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे. सणासुदीच्या काळात त्यांना बँकेकडून अ‍ॅपलच्या प्रोडक्ट्सवर कोणतीही विशेष डील मिळणार नाही.

काय म्हटलंय बँकेनं?

"बँक या पार्टनरशिपचा खर्च आणि उत्पन्न यांची समीक्षा करत आहे. आम्ही यामध्ये तात्पुरता ब्रेक घेतलाय. आम्ही एकत्र ५ वर्ष काम केलंय. आमचे कंपनीसोबत चांगले संबंध आहेत. परंतु आता त्याची समीक्षा करणं गरजेचं होतं," अशी प्रतिक्रिया एचडीएफसी बँकेचे ग्रूप हेड पराग यांनी दिली. टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातील वृत्त दिलंय.

काय आहे प्रकरण?

अ‍ॅपलच्या वेबसाईटनुसार, ते अमेरिकन एक्सप्रेस, अ‍ॅक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या कार्डासोबत कॅशबॅक आणि ईएमआयची सुविधा देत आहेत. "अ‍ॅपलनं अनेक बँकांसोबत करार केले आहेत. गेल्या ५ वर्षांत केवळ आम्ही त्यांना ही सेवा देत होतो. अशात पार्टनरशिपवर विचार करणं आवश्यक झालं होतं. बँक सणासुदीसाठी तयार आहे," असंही त्यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :अॅपलएचडीएफसी