Join us

पतधोरण समितीच्या बैठकीपूर्वी HDFC चा ग्राहकांना झटका, पुन्हा होमलोन महागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 3:34 PM

देशातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील बँक एचडीएफसीनं आपल्या रेपो लिंक्ड होम लोनच्या व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर आता अतिरिक्त बोजा पडणार आहे.

HDFC Bank Home Loan Rates: देशातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील बँक एचडीएफसीनं आपल्या रेपो लिंक्ड होम लोनच्या व्याजदरात वाढ केली आहे. एचडीएफसीनं यात १०-१५ बेसिस पॉईंट्सची वाढ केलीये. यानंतर एचडीएफसी बँकेचे होम लोनचे व्याजदर वाढून ९.०५ टक्के ते ९.८ टक्के झाले आहेत. 

बँकेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार व्याजदरातील हे बदल १ जुलै २०२३ रोजी एचडीएफसी बँक आणि एचडीएफसीच्या विलिनीकरणामुळे लागू झाले आहे. आता त्यांचे होम लोनचे दर रिटेल प्राईम लेंडिंग रेटशी (आरपीएलआर) लिंक्ड नसतील. व्याजदर वाढल्याच्या घोषणेनंतर गुरुवारी एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्येही तेजी दिसून आली होती. गुरुवारी एचडीएफसीचे शेअर्स ०.४४ टक्क्यांनी वाढून १,४४७ रुपयांवर बंद झाले. 

बहुतांश होम लोन रेपो रेटशी लिंक्ड 

१ ऑक्टोबर २०१९ नंतर मंजूर केलेली सर्व रिटेल लोन्स एक्स्टरनल बेंचमार्कशी जोडलेली आहेत. बहुतेक बँकांच्या बाबतीत, हा बेंचमार्क रेपो रेट आहे. एचडीएफसी लिमिटेडचे ​​आता एचडीएफसी बँकेत विलीनीकरण करण्यात आलंय. "एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणापूर्वी, एचडीएफसी ८.३० ते ८.४५ टक्के व्याजदरानं होम लोन देत होती. विलीनीकरणानंतर, एचडीएफसी बँक पोर्टफोलिओ स्तरावर होम लोनवरील व्याजदरात वाढ करत आहे. त्याचा वाढता खर्च हे यामागचे कारण आहे," अशी माहिती मॉरगेज वर्ल्डचे फाऊंडर विपुल पटेल यांनी दिली.

टॅग्स :एचडीएफसी