HDFC Life Insurance Data Leak : एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स डेटा लीक प्रकरण समोर आलं आहे. डेटा लीकची काही प्रकरणं समोर आली असून या डेटा लीकच्या संभाव्य परिणामाचं मूल्यांकन केलं जात असल्याचं खुद्द कंपनीनंच सोमवारी सांगितलं. यानंतर एचडीएफसी लाइफनं आपल्या ग्राहकांना डेटा चोरीच्या घटनेबाबत सतर्क केलंय. 'एका अज्ञात स्त्रोतानं आपल्या ग्राहकांचे 'काही डेटा फिल्ड' चुकीच्या हेतूने शेअर केले आहेत, असं कंपनीकडून सांगण्यात आलंय.
विमा कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी यावर आवश्यकतेनुसार सुधारणा केल्या जातील. 'आम्ही आमच्या ग्राहकांच्या डेटा गोपनीयतेला महत्त्व देतो आणि त्वरित उपाय म्हणून आम्ही माहिती सुरक्षा मूल्यांकन आणि डेटा लॉग विश्लेषण सुरू केलं आहे,' असं कंपनीनं नमूद केलंय.
एचडीएफसी लाइफचा व्यवसाय लाइफ इन्शुरन्सशी संबंधित आहे आणि कंपनी विविध पर्सनल आणि ग्रुप इन्शुरन्स पॉलिसी प्रदान करते. डेटा शेअरिंगच्या समस्येचं मूल्यांकन करण्यासाठी आणि कारवाई करण्यासाठी कंपनीनं इन्फॉर्मेशन सिक्युरिटी एक्सपर्ट्सशी संपर्क साधला आहे. या घटनेचं कारण शोधण्यासाठी आणि आवश्यक ती कारवाई करण्यासाठी माहिती सुरक्षा तज्ज्ञांच्या मदतीने चौकशी केली जात आहे, असं एचडीएफसी लाइफनं एका निवेदनात म्हटलंय.