नवी दिल्ली: खासगी क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर येत आहे. HDFC चे आता बँकेत विलिनीकरण करण्यात येणार आहे. संचालक मंडळाने या विलिनीकरणाला हिरवा कंदील दाखवला असून, आगामी काही काळात ही प्रक्रिया पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे. विलिनीकरणाचे वृत्त समोर येताच HDFC चे शेअर्स मोठ्या प्रमाणात वाढल्याची माहिती देण्यात आली आहे.
गृहकर्ज पुरवठादारांपैकी आघाडीची वित्त संस्था असलेल्या हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनचे (HDFC) आता एचडीएफसी बँकेत विलिनीकरण करण्यात येणार आहे. म्हणजेच आता यापुढे HDFC बँक आणि उपकंपनी असलेली हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन या दोन संस्था एकत्र करण्यात येणार आहेत. एचडीएफसी बँकेच्या संचालक मंडळाने या विलीनीकरणाला मंजुरी दिली असल्याचे कंपनीने शेअर बाजाराला कळवले आहे. या घोषणेनंतर शेअर बाजारात एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी या दोन्ही कपन्यांच्या शेअरमध्ये मोठी उसळी दिसून आली.
एचडीएफसीच्या संचालक मंडळाने दिली मंजुरी
HDFC च्या उपकंपनी असलेल्या एचडीएफसी इन्व्हेस्टमेंट लिमिटेड आणि एचडीएफसी होल्डिंग्ज लिमिटेड या दोन्ही कंपन्या एचडीएफसी बँकेत विलीन करण्यात येतील. विलीनीकरणाच्या प्रस्तावाला नुकताच एचडीएफसीच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली. हे विलीनीकरण दोन्ही बरोबरीच्या कंपन्यांचे एकत्रीकरण असल्याचे मत एचडीएफसी अध्यक्ष दीपक पारेख यांनी सांगितले. शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, एचडीएफसी ही दोन उपकंपन्यांना एचडीएफसी बँकेत विलीन करणार आहे. यातून एचडीएफसीचा एचडीएफसी बँकेत ४१ टक्के हिस्सा होईल. आर्थिक २०२४ च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण होईल, असे कंपनीने म्हटले आहे.
दरम्यान, विलीनीकरणाची घोषणा झाल्यानंतर आज शेअर बाजारात त्याचे पडसाद उमटले. सकाळच्या सत्रात एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये मोठी वाढ झाली आहे. शेअर बाजारात एचडीएफसीचा शेअर तब्बल १३.४७ टक्के वाढ झाली आहे. तो सध्या २७८३ रुपयांवर आहे. आज एका शेअरमध्ये ३३० रुपयांची वाढ झाली. त्याशिवाय एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये देखील ९.५४ टक्के वाढ झाली आहे. एचडीएफसी बँकेचा शेअर १६५४ रुपयांवर असून त्यात १४७ रुपयांची वाढ झाली आहे.