HDFC Home Loan Interest Rate: देशातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक एचडीएफसीनं नवीन वर्षात आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. एचडीएफसीनं काही मुदतीच्या कर्जावर एमएलसीआर वाढवला आहे. बँकेने एमएलसीआर १० बेसिस पॉइंट्स म्हणजेच ०.१० टक्क्यांनी वाढवला आहे. बँकेचा एमएलसीआर वाढवल्यान, गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि वाहन कर्जासह सर्व प्रकारच्या फ्लोटिंग रेटवरील कर्जाचा ईएमआय वाढेल. म्हणजेच नवीन वर्षात ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार आहे. हे नवीन दर आजपासून लागू झाले आहेत.
- एका महिन्याचा एमएलसीआर ५ bps ने ८.७५ टक्क्यांवरून ८.८० टक्के करण्यात आला आहे.
- तीन महिन्यांचा एमएलसीआरदेखील पूर्वीच्या ८.९५ टक्क्यांवरून वाढवून ८.९० टक्के करण्यात आलाय.
- सहा महिन्यांचा एमएलसीआर ९.२०५ टक्के झालाय.
- एक वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी एमएलसीआर ९.२५ टक्के आहे. त्यात ०.०५ टक्के वाढ करण्यात आली आहे. पूर्वी तो ९.२० टक्के होता.
- २ वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी एमएलसीआर ९.२५ टक्के करण्यात आला आहे.
- ३ वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी एमएलसीआर ९.३० टक्के करण्यात आलाय.
ईएमआय वाढणार
एमएलसीआरमधील वाढीचा परिणाम गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज यासह सर्व प्रकारच्या कर्जाच्या व्याजदरांवर दिसून येईल. कर्जासाठी आता ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त ईएमआय भरावा लागेल. नवीन कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना अधिक व्याजदरानं कर्ज मिळेल. दिवाळीपूर्वीही एमएलसीआर वाढवून बँकेनं ग्राहकांना झटका दिला होता.
कसा ठरतो एमएलसीआर?
डिपॉझिट रेट, रेपो रेट, ऑपरेशनल कॉस्ट आणि कॅश रिझर्व्ह रेशो राखण्याची किंमत असे विविध घटक एमएलसीआर ठरवताना विचारात घेतले जातात. रेपो दरातील बदलांचा एमएलसीआर दरावर परिणाम होतो. एमएलसीआरमधील बदल कर्जाच्या व्याजदरावर परिणाम करतात, ज्यामुळे कर्जदारांचा ईएमआय वाढतो.