Join us  

मोठी बातमी! HDFC, PNB कडून कर्जदारांना झटका; गृहकर्जाचे EMI वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2022 1:28 PM

देशातील सर्वात मोठी हाऊसिंग फायनान्स म्हणून ओळख असलेल्या एचडीएफसी बँकेनं गृहकर्जाच्या रिटेल प्राइम लेन्डिंग रेट्समध्ये (RPLR) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई-

देशातील सर्वात मोठी हाऊसिंग फायनान्स म्हणून ओळख असलेल्या एचडीएफसी बँकेनं गृहकर्जाच्या रिटेल प्राइम लेन्डिंग रेट्समध्ये (RPLR) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या फ्लोटिंग आणि अॅडजस्टेबल रेट्समध्ये ०.५ बेसिस पॉइंट्सनं वाढ झाली आहे. बँकेचे नवे दर आजपासून लागू होणार आहेत. यानिर्णायाचा गृहकर्जदारांना मोठा फटका बसणार आहे. गृहकर्जाचे हप्ते (EMI) आता वाढणार आहेत. 

दुसरीकडे पंजाब नॅशनल बँकेनंही गृहकर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे. रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात वाढ करण्यात आल्यानंतर बहुतांश बँकांनीही आपल्या कर्जदरात वाढ केली आहे. त्यामुळे पंजाब नॅशनल बँकेनंही आता व्याजदर वाढवले आहेत. पीएनबीकडून गृहकर्जाच्या दरात थेट १५ बेसिस पॉईंटनं वाढ करण्यात आली आहे. याचा मोठा धक्का गृहकर्जदरांना बसणार आहे. पीएनबीचा एका वर्षासाठीचा MCLR दर आता ७.२५ टक्क्यांवरुन ७.४० टक्के इतका झाला आहे. त्यामुळे ज्या ग्राहकांनी MCLR पद्धतीनं कर्ज घेतलं आहे त्यांच्या ईएमआयमध्ये वाढ निश्चित आहे. 

नुकतंच स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदानंही आपल्या MCLR मध्ये वाढ केली होती. अनेक बँकांनी आपल्या गृहकर्जावरील फ्लोटिंग रेट ऑफ इंटरेस्टमध्ये वाढ केली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात  भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) चलनविषयक धोरण समितीची (MPC) बैठक बोलावली होती. यात रेपो दरात (Repo Rate) ०४० टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली गेली. त्यानंतरच बँकांकडून व्याजदरात वाढ करण्याचे संकेत देण्यात आले होते. 

आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक आता ६ ते ८ जून दरम्यान होणार आहे. या बैठकीत कर्ज विषयक धोरण समितीच्या बैठकीतील सविस्तर माहिती ते देतील. तसंच या बैठकीत रेपो दरात पुन्हा वाढ केली जाण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे कर्जदारांमध्ये धाकधूक वाढली आहे.

टॅग्स :एचडीएफसीपंजाब नॅशनल बँकबँकिंग क्षेत्र