मुंबई : ‘पंजाब व महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँके’ने (पीएमसी) संकटग्रस्त ‘एचडीआयएल’ला अवघ्या ३,१२२.८९ कोटी रुपये मूल्याच्या तारण मालमत्तेवर तब्बल ६,१२१ कोटी रुपये कर्ज दिलेले असल्याची माहिती समोर आली आहे, अशा कर्जामुळेच पीएमसी बँक बुडाली आहे, असे जाणकार सूत्रांनी सांगितले.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने एस्प्लेनेड कोर्टात गेल्या महिन्यात ‘एचडीआयएल’विरुद्ध दाखल केलेल्या आरोपपत्रात ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, रिअल इस्टेट क्षेत्रातील एकेकाळची मान्यवर कंपनी असलेल्या ‘एचडीआयएल’ने २0११मध्येच कर्जाचे हप्ते थकवायला सुरुवात केली होती. तरीही पीएमसी बँकेने कंपनीला नवी कर्जे दिली. नव्या कर्जासाठी कोणतेही नवे तारण अथवा हमी बँकेने घेतली नाही. कर्ज देताना बँकेने पुरेशी हमी घेतलेली नाही, असे खुद्द रिझर्व्ह बँकेच्या एका अहवालातही नमूद करण्यात आल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. पीएमसी बँक बुडण्यास ‘एचडीआयएल’ला देण्यात आलेल्या कर्जाची सर्वात मोठी भूमिका राहिली आहे. बँकेने दिलेल्या एकूण कर्जापैकी ७५ टक्के कर्ज ‘एचडीआयएल’ला देण्यात आले आहे. एका कर्ज सल्लागाराने सांगितले की, तारण जमिनीच्या मूल्याच्या ५0 ते ६0 टक्के कर्ज बँकांकडून दिले जाते. उदा. एखादी कंपनी १00 कोटी रुपये मूल्याची जमीन बँकेकडे तारण
ठेवणार असेल, तर बँक त्या तारणावर ५0 ते ६0 कोटी रुपयांचे कर्ज कंपनीला देईल. पीएमसी बँकेने ‘एचडीआयएल’ला कर्ज देताना हा नियम धाब्यावर बसविल्याचे दिसून आले आहे. ‘एचडीआयएल’ने तारण दिलेल्या मालमत्तेच्या मूल्याच्या दुपटीपेक्षा जास्त कर्ज बँकेने कंपनीला दिले.
पीएमसी बँकेच्या संचालकांचे ‘एचडीआयएल’च्या प्रवर्तकांसोबतचे निकटचे संबंधही बँक बुडण्यास कारणीभूत ठरले असल्याचे आरोपपत्रावरून दिसते. पीएमसी बँकेचे अटकेतील व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांचे एचडीआयएलचे प्रवर्तक राकेश वाधवान यांच्या परिवारासोबत निकटचे संबंध होते. त्यामुळे थॉमस यांनी ‘एचडीआयएल’ला कर्ज देताना सर्व नियम बाजूला सारले, असे दिसते.
>व्यवसायातही भागीदारी
पीएमसी बँकेचे चेअरमन वर्यम सिंग आणि ‘एचडीआयएल’चे प्रवर्तक राकेश वाधवान यांचेही निकटचे संबंध होते. दोघे एकाच महाविद्यालयात शिकले. त्यांची बांधकाम व्यवसायात भागीदारीही होती. सिंग यांनी एचडीआयएलच्या संस्थांमध्ये अनेक महत्त्वाची पदेही सांभाळली. या प्रकरणात थॉमस, वर्यम सिंग, राकेश वाधवा आणि त्याचा मुलगा सारंग वाधवा यांच्यासह १२ जणांना अटक करण्यात आलेली आहे.
पीएमसी बँक बुडण्यासाठी एचडीआयएलच कारणीभूत
पीएमसी संकटग्रस्त ‘एचडीआयएल’ला अवघ्या ३,१२२.८९ कोटी रुपये मूल्याच्या तारण मालमत्तेवर तब्बल ६,१२१ कोटी रुपये कर्ज दिलेले असल्याची माहिती समोर आली आहे,
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 04:18 AM2020-01-08T04:18:33+5:302020-01-08T04:18:45+5:30