नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचे अनेक राज्यांत आंदोलन सुरू असतानाच शेतकऱ्यांच्या रोषाची धार कमी करण्यासाठी केंद्र सरकारने किमान आधारभूत किमतीवरील (एमएसपी) तांदूळ खरेदी सुरू केली आहे. पहिल्या ४८ तासांत १०.५३ कोटी रुपयांचा तांदूळ सरकारने शेतकºयांकडून खरेदी केला आहे. कृषिमाल विक्रीच्या नियमनासाठी नवीन कायदे केले असले तरी एमएसपी म्हणजेच हमीभाव व्यवस्था सुरूच राहणार असल्याचा संदेश शेतकºयांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरू आहे.
सूत्रांनी सांगितले की, खरिपाचा तांदूळच नव्हे, तर डाळी आणि तेलबियांची खरेदीही सरकारकडून हमीभावावर केली जाणार आहे. नव्या कृषी कायद्यांमुळे सरकारकडून एमएसपीवर आधारित हमीभाव खरेदी बंद पडून शेतमालाची संपूर्ण खरेदी व्यवस्था खासगी कंपन्यांच्या हातात जाईल, अशी भीती शेतकºयांना वाटत आहे. कृषी मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, पंजाब व हरियाणात हमीभाव खरेदी सुरू झाल्यानंतर पहिल्या ४८ तासांत ३९० शेतकºयांकडून १०.५३ कोटी रुपयांचा तांदूळ खरेदी करण्यात आला.