Join us  

हेल्थ इन्शूरन्सचा दावा नाकारला, तुमचीही अशी तक्रार आहे? जाणून घ्या क्लेम मिळवण्याची योग्य पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 1:14 PM

आपला हेल्थ इन्शूरन्सचा क्लेम रिजेक्ट झालाय अशी तक्रार अनेकांकडून यापूर्वी ऐकली असेल. तो नाकारण्याची काही मूलभूत कारणं असू शकतात.

आपला हेल्थ इन्शूरन्सचा क्लेम रिजेक्ट झालाय अशी तक्रार अनेकांकडून यापूर्वी ऐकली असेल. हेल्थ इन्शूरन्सचा क्लेम नाकारण्याची काही मूलभूत कारणं असू शकतात. त्यामुळे त्या चुका टाळता याव्यात म्हणून ते जाणून घेणं आवश्यक आहे. पाहूया अशी काही जी टाळून तुम्ही क्लेम रिजेक्ट होण्यापासून थांबवू शकता.

पॉलिसीचा कालावधीबहुतांश हेल्थ इन्शूरन्स स्कीम्स या कालबद्ध करार असतात. या पॉलिसी सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला दरवर्षी त्या रिन्यू कराव्या लागतात. अनेकदा पॉलिसीधारकांना आपल्या पॉलिसीचा कालावधी संपल्याची कल्पना नसते. ज्यावेळी क्लेम रिजेक्ट होतो त्यावेळी त्यांना यासंदर्भातील माहिती समजते. अशा परिस्थितीत मोठा फटका बसू शकतो. जर पॉलिसीचा कालावधी संपला असेल तर इन्शूरन्स कंपनी क्लेम देण्यास कटिबद्ध नाही.

असे कटू अनुभव टाळण्यासाठी, विमाधारकाने पॉलिसी रिन्यू करण्यावर बारकाईनं ट्रॅक ठेवला पाहिजे. जर तुम्ही पॉलिसी रिन्यू केली नसेल तर तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाही, बहुतेक विमा कंपन्या १५ दिवसांचा वाढीव कालावधी देतात ज्या दरम्यान तुम्ही पॉलिसी मुदतीदरम्यान मिळवलेले फायदे न गमावता पॉलिसी रिन्यू करतात. तथापि, ब्रेक-इन कालावधी दरम्यान उद्भवणारा कोणताही दावा विमा कंपनीकडून स्वीकारला जात नाही.

अन्य आजारांची माहिती न देणंहेल्थ इन्शूरन्स घेताना आधीपासून अस्तित्वात असलेल्या आजारांची माहिती देणं आवश्यक आहे. जसं की विमाधारकाला रक्तदाब, हृदयविकार, उच्च रक्तदाब इ. यापूर्वी कोणावर कोणतीही मोठी शस्त्रक्रिया झाली असेल तर त्याचाही खुलासा करावा लागतो. विमा नूतनीकरणाच्या वेळी अलीकडील भूतकाळात उद्भवलेली कोणतीही नवीन वैद्यकीय स्थिती किंवा आजारांबद्दल माहिती देणं महत्त्वाचं आहे. हेल्थ इन्शूरन्स पॉलिसीमध्ये, क्लेमच्या वेळी त्रास टाळण्यासाठी विमाकर्त्यासोबत आरोग्याशी संबंधित तपशील प्रामाणिकपणे शेअर करणे अत्यंत महत्त्वाचं असतं.

वेटिंग पीरिअडहेल्थ इन्शूरन्समध्ये अनेकदा वेटिंग पीरिअड असतो. या कालावधीत कोणत्याही स्थितीत क्लेम करता येत नाही. विमा घेतल्याच्या तारखेपासून हा कालावधी सुरू होतो आणि तो प्रत्येक कंपनी किंवा आजारांनुसार निराळा असू शकतो. संबंधित पॉलिसीधारकानं क्लेमसाठी तो कालावधी पूर्ण करणं आवश्यक आहे. त्यामुळे हेल्थ इन्शूरन्स घेताना त्याच्या वेटिंग पीरिअड किती आहे हा क्लॉज समजून घेणं अनिवार्य आहे. वेटिंग पीरिअडदरम्यान क्लेम केल्यास तो नाकारला जातो.

आजाराचा समावेश नसणंसर्व विमा पॉलिसी कव्हरेज आणि त्यातून वगळण्यात आलेल्या आजारांचा यादीत समावेश असतो. जर यादीत दिलेल्या आणि वगळण्यात आलेल्या आजारांमध्ये समावेश असलेल्या आजाराबद्दल जर क्लेम केला गेला, तर तो नाकारला जातो. म्हणूनच, पॉलिसीमध्ये काय समाविष्ट नाही हे जाणून घेण्यासाठी पॉलिसी खरेदी करताना वगळलेल्या आजारांच्या यादीवर नजर टाकणं आवश्यक आहे.

दीर्घ कालावधीनंतर क्लेम करणंविमा पॉलिसींमध्ये विशिष्ट कालमर्यादेचा उल्लेख असतो. या कालावधीतच पॉलिसीधारकानं दावा करणं आवश्यक आहे. सहसा पॉलिसी क्लेम दाखल करण्याच्या तारखेपासून ६०-९० दिवसांच्या कालावधीची परवानगी देते. या मुदतीचं पालन करण्यात अयशस्वी झाल्यास दावा नाकारला जाऊ शकतो. त्यामुळे डिस्चार्ज झाल्यानंतर लगेचच दावा दाखल करणं हुशारीचं ठरू शकतं. यात विलंब झाल्यास तुमचा दावा नाकारला जाऊ शकतो.

कागदपत्रांची पूर्तताकाहीवेळा क्लेम, विशेषत: री-एम्बर्समेंटचे क्लेम गहाळ झालेल्या किंवा चुकीच्या कागदपत्रांमुळे नाकारले जातात. अशा परिस्थितीत, पॉलिसीधारकानं कोणतीही समस्या टाळण्यासाठी सर्व मूळ कागदपत्रे, टेस्ट रिपोर्ट, डॉक्टर कन्सल्टेशन फॉर्म आणि इतर आवश्यक कागदपत्रांसह रीतसर भरलेल्या क्लेम फॉर्मसह सादर करणं आवश्यक आहे. क्लेम लवकर दाखल केल्यानंतर, कोणतेही कागदपत्र मिळत नसल्यास विमा कंपनी त्याची माहिती देते. जेणेकरून तुम्ही सर्व कागदपत्रे वेळेत जमा करू शकता.

टॅग्स :आरोग्यवैद्यकीय