तुम्ही आरोग्य विमा काढला आहे? - काढला नसेल, तर आधी काढा आणि काढला असेल तर तो तुम्ही कसा काढलात? एजंटाकडून की ऑनलाइन?..खरं तर बहुतांश लोक आरोग्य विमा काढताना एजंटलाच पसंती देतात. त्यांना वाटतं, आपला एजंट आपल्याला योग्य ती आणि सर्व माहिती देईल (बऱ्याचदा तो देतोही), पण हाच आरोग्य विमा ऑनलाइन काढला तर आपली फसवणूक होईल, आपल्याला योग्य ती माहिती मिळणार नाही, पैसे डुबतील अशी उगीचच शंका अनेकांच्या मनात डोकावत असते.. पण तुम्हाला आरोग्य विमा अजून काढायचा असेल, तर ऑनलाइनलाही एक संधी देऊन पाहा. कदाचित तुमचा पूर्वग्रह दूर होईल आणि ऑनलाइन विमा आपल्याला चांगलाच फायद्यात पडतो, आपला पैसाही वाचतो हे तुमच्या लक्षात येईल. आरोग्य विमा ऑनलाइन काढला तर काय आहेत त्याचे फायदे?१- ऑनलाइन आरोग्य विमा घेताना आपल्याला सोयीचे, फायद्याचे आणि गरजेचे असलेले आरोग्य विम्याचे अनेक पर्याय आपल्याला उपलब्ध होतात. तुम्ही ‘गोंधळात’ पडला नाहीत, तर अत्यंत चांगला आरोग्य विमा स्वस्तात तुम्हाला मिळू शकतो.२- इतके पर्याय पाहिल्यावर आपण गोंधळात पडला असलात, तर कोणत्या पॉलिसीत काय मिळेल, याची तुलनाही आपल्याला तिथेच पाहायला मिळेल. अर्थातच त्यासाठी काही मिनिटांपेक्षा जास्त वेळही लागणार नाही.३- एखादी पॉलिसी आवडली तर, ती घेण्यासाठीची प्रक्रियाही ऑफलाइनपेक्षा अतिशय सुलभ आहे. माहिती भरून बसल्या बसल्या ऑनलाइन पेमेंट केलं की झालं!४- आरोग्य विम्यासाठी ऑनलाइन पेमेंट सुरक्षित आहे का, याबाबत अनेकांना शंका असते, पण नामांकित कंपन्यांशी केलेला व्यवहार पूर्णत: सुरक्षित असतो. कारण, त्यासाठीची सगळी काळजी ते घेत असतात. ५- ऑनलाइन आरोग्य विमा घेतल्यामुळे कंपनी आणि तुम्ही यांच्यात थेट व्यवहार होतो. यात एजंट किंवा मध्यस्थ नसल्याने व्यवहार फटाफट होतात, पैसे भरल्याबरोबर ताबडतोब पॉलिसी तुमच्या हातात पडते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एजंट नसल्यामुळे यात तुमचे बरेच पैसे वाचतात. स्वस्तात हवी तशी पॉलिसी मिळू शकते. ६- प्रत्येक कंपनीनं आपल्या अटी, शर्ती, पॉलिसीमध्ये समाविष्ट गोष्टी याची माहिती वेबसाइटवर दिलेली असते. त्यामुळे अमुक एक गोष्ट त्यात आहे की नाही, याविषयी शंका राहत नाही. सगळा व्यवहार स्पष्ट आणि पारदर्शक असतो. एजंटाला एवढी सगळी माहिती असेलच असं नाही.
Health Insurance: आरोग्य विमा ऑनलाइन घ्यावा का? तज्ज्ञ देतात असा सल्ला...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2022 5:43 AM