Join us

देशातील थेट परकीय गुंतवणूक उच्चांकावर; 10 टक्क्यांनी वाढ, गुजरात अव्वल, तर महाराष्ट्र...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 12:36 PM

FDI in India: जगभरामध्ये कोरोनाचा प्रकोप सुरू असतानाच सन २०२०-२१मध्ये भारतात आलेल्या थेट परकीय गुंतवणुकीमध्ये १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. आतापर्यंतची सर्वाधिक गुंतवणूक या वर्षामध्ये मिळाली आहे.

नवी दिल्ली : जगभरामध्ये कोरोनाचा प्रकोप सुरू असतानाच सन २०२०-२१मध्ये भारतात आलेल्या थेट परकीय गुंतवणुकीमध्ये १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. आतापर्यंतची सर्वाधिक गुंतवणूक या वर्षामध्ये मिळाली आहे. गुजरातला यावेळी सर्वाधिक थेट परकीय गुंतवणुकीचा लाभ मिळाला असून, महाराष्ट्र आणि कर्नाटक हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत. सन २०२०-२१मध्ये देशात ८१.७२ अब्ज डाॅलरची थेट परकीय गुंतवणूक झाली असून, हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. त्याआधीच्या वर्षामध्ये भारतात ७४.३९ अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली होती. याचाच अर्थ आधीच्या वर्षापेक्षा १० टक्क्यांनी अधिक गुंतवणूक भारताकडे आकर्षित झाली आहे. सरकारने थेट परकीय गुंतवणुकीची सुलभ केलेली प्रक्रिया आणि देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत निर्माण केलेला विश्वास यामुळे ही गुंतवणूक वाढल्याचे सरकारी सुत्रांनी स्पष्ट केले आहे. सन २०२०-२१ या वर्षामध्ये आलेल्या थेट परकीय गुंतवणुकीपैकी सर्वाधिक म्हणजे ३७ टक्के वाटा हा गुजरातला मिळाला आहे. गुजरातमध्ये झालेली गुंतवणूक ही मुख्यत: माहिती तंत्रज्ञान आणि बांधकाम क्षेत्रामध्ये झाली आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्राचा क्रमांक लागत असून, त्याचा वाटा २७ टक्के आहे. कर्नाटकला १३ टक्के गुंतवणूक मिळाली असून, ते तिसऱ्या स्थानावर गेले आहे. सन २०१९-२०मध्ये देशात कर्नाटकला सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक मिळाली होती तर महाराष्ट्र आणि गुजरात अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर होते.  

सिंगापूरची गुंतवणूक सर्वाधिकया वर्षामध्ये भारतात झालेल्या थेट गुंतवणुकीमध्ये सिंगापूरचे स्थान अव्वल राहिले असून, या देशातून २९ टक्के गुंतवणूक भारतामध्ये आली आहे. त्यापाठोपाठ अमेरिका (२३ टक्के ) आणि मॉरिशस (९ टक्के) यांचा क्रमांक लागत आहे. आधीच्या वर्षाशी तुलना करता, सौदी अरेबियाकडून या वर्षामध्ये सर्वाधिक गुंतवणूक झाली आहे. भारतात झालेल्या थेट परकीय गुंतवणुकीपैकी सर्वाधिक ४४ टक्के वाटा हा संगणकाच्या सॉफ्टवेअर व हार्डवेअरचा आहे. त्यापाठोपाठ बांधकाम आणि पायाभूत सुविधा यांचा क्रमांक लागतो.

टॅग्स :परकीय गुंतवणूकभारतअर्थव्यवस्था